भंडारा : चुलत बहिणीच्या साक्षगंधासाठी आलेल्या एका महिलेची सोन्या-चांदीचे दागिने असलेली पर्स लंपास करण्याची घटना बेला येथील कारेमोरे सेलिब्रेशन लाॅनवर घडली होती. या प्रकरणी भंडारा पोलिसांनी चोरीचा छडा लावत चोरट्याला मध्य प्रदेशातील कडिया येथून अटक करण्यात आली. त्याच्याजवळून चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
विवेक रणधीर सिसोदिया (२२) रा. कडिया, ता. पाचौर, जि. राजगड असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. चंद्रपूरच्या नूतन मयूर बारापात्रे या भंडारा येथे आपल्या चुलत बहिणीच्या साक्षगंधासाठी १६ डिसेंबर रोजी आल्या होत्या. त्यावेळी त्यांच्याजवळ असलेली हिरव्या रंगाची पर्स चोरट्यानी लंपास केली होती. त्यात १४ ग्रॅम वजनाचे नेकलेस, पाच ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, ३ ग्रॅम वजनाची नथ, सोन्याचे टाॅप्स, चांदीच्या तोरड्या, कडे होते. याप्रकरणी भंडारा पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. पोलिसांनी तांत्रिक पुराव्यावरून शोध जारी केला. त्यावेळी चोरटा मध्य प्रदेशातील असल्याचे पुढे आले. भंडारा ठाण्याचे गुन्हे शोध पथक तात्काळ मध्यप्रदेशातील कडिया येथे पोहचले आणि चोरटा विवेक सिसोदिया याला ताब्यात घेतले.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव, अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती, पोलीस निरीक्षक लोकेश कानसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अरविंद जगने, अशोक जटाळ, ओंकार श्रीवास, बापू भुसावळे, प्रशांत भोंगाडे, साजन वाघमारे, अजय कुकडे, संदीप बन्सोड व भेनाथ बुरडे यांनी केली.