नगराध्यक्ष सुनील मेंढे : रोजगार व उद्योग मार्गदर्शन मेळावालोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : महिलांनी प्रधानमंत्री मुद्रा योजनेची परिपूर्ण माहिती करून मुद्रा कर्ज घ्यावे व स्वत:चा व्यवसाय करावा. या योजनेमध्ये कुठल्याही गॅरंटीची आवश्यकता नसल्याने हे कर्ज सुलभ मिळू शकते. फक्त व्यवसायासंबंधी कागदपत्रांची पूर्तता करून घरबसल्या हे कर्ज उपलब्ध होऊ शकते. तसेच कर्जाची नियमित परतफेड केल्यास पुन्हा कर्ज मिळून कर्ज मर्यादेत वाढ सुद्धा करता येते. जिद्द व मेहनतीच्या बळावर प्रत्येक व्यक्ती व्यसायात यशस्वी होऊ शकतो. असे प्रतिपादन भंडारा नगराध्यक्ष सुनिल मेंढे यांनी केले.जिल्हा माहिती अधिकारी कार्यालय भंडारा व महिला आर्थिक विकास महामंडळ जिल्हा कार्यालय भंडारा यांचे संयुक्त विद्यमाने प्रधानमंत्री मुद्रा योजनेचा प्रसार प्रचार होण्यासाठी बेरोजगार तरुण तरुणी, बचत गटातील महिला यांचेकरिता रोजगार उद्योग मार्गदर्शन मेळावा तसेच नवप्रभा लोकसंचालित साधन केंद्र भंडारा यांची वार्षिक सर्वसाधारण सभा पोलीस बहुउद्देशिय सभागृह भंडारा येथे आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी अग्रणी जिल्हा बँक व्यवस्थापक विजय बागडे हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून माविम नागपूर विभागाचे विभागीय सनियंत्रयण व मुल्यमापन अधिकारी केशव पवार, जिल्हा माहिती अधिकारी रवी गीते, आसणे, बँक आॅफ इंडियाचे व्यवस्थापक शशांक कुळकर्णी, माविमंचे जिल्हा समन्वय अधिकारी प्रकाश हिवाळे, स्टार स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेचे संचालक एन.वाय. सोनकुसरे, शेख, वर्षा सार्वे, सविता भोंगाडे, भावना डोंगरे व अरुणा बांते उपस्थित होते.प्रधानमंत्री मुद्रा लोन सर्वसामान्य व्यक्तीसाठी असून या लोनद्वारे आपले उद्योग उभारण्याचे स्वप्न पूर्ण करा सोबतच कर्ज परतफेडीची नियमित सवय लावून बँकांचा विश्वास जिंका असे सुनिल मेंढे म्हणाले.अग्रणी जिल्हा बँक व्यवस्थापक विजय बागडे यांनी प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत उद्योग करू इच्छिणाऱ्या महिलांन बँकेत येऊन योजनेची माहिती घेऊन जास्तीत जास्त लाभ घेण्याचे तसेच याकरिता सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आवाहन केले. यावेळी शशांक कुलकर्णी म्हणाले की, लोकांचे अज्ञान व उदासिनता यामुळे याआधी बँकेतर्फे त्यांना कर्ज मिळण्यास अडचण आली. आज प्रधानमंत्री मुद्रा योजनेची शासनातर्फे विस्तृत प्रसिद्धी करण्यात आली. त्यामुळे या योजनेची लोकप्रियता वाढली आहे. या योजनेचा लाभ महिलांनी घेवून इतरांनाही याची माहिती द्यावी, असे त्यांनी सांगितले.यावेळी केव पवार यांनी बचत गटाच्या वार्षिक सभेस महिला आवर्जून येतात. यावरून महिलांना बचत गटाचे किती महत्व आहे हे कळले आहे, असे सांगितले. ज्या पुरुषासोबत अख्खं आयुष्य घालविले त्याने जे दिले नाही ते या बचत गटाच्या माध्यमातून मिळाले अशी भावना आज या महिलांमध्ये जागृत झाली आहे. महिलांना बचत गटाचे महत्व कळाले हे सिद्ध झाले. बचत गटाची रक्कम महिला नियमित भरतात यावरून त्यांना जाणीव आहे की जर हप्ता भरला नाही तर त्यांचे परिणामही आपणास भोगावे लागतील. बचत गटाची चळवळ मोठ्या प्रमाणात फोफावली आहे. याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.महिलांनी आपल्यामध्ये असणारया सुप्त गुणांना वाव देऊन आपला स्वत:चा व्यवसाय सुरु करण्यासाठी प्रधानमंत्री मुद्रा योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे सांगितले.स्टार स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेचे संचालक एन.वाय. सोनकुसरे यांनी तरुण - तरुणी, बचत गटातील महिलांनी स्वत:चा उद्योग व्यवसाय सुरु करण्यासाठी कौशल्य विकस प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा असे सांगितले. नवप्रभा लोकसंचालित साधन केंद्र भंडाराच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये वर्ष २०१६-१७ मधील केलेल्या कामाचे वाचन व्यवस्थापक रंजना खोब्रागडे यांनी केले. तसेच सदस्यांनी आपल्या सुप्त गुणांचा अविष्कार करून नृत्याद्वारे उपस्थितांचे मनोरंजन केले.या मेळाव्यात स्त्री भ्रूणहत्या या विषयावरील रांगोळी स्पर्धात पुरस्कार प्राप्त आयटीआयच्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच नवप्रभा लोकसंचालित साधन केंद्राच्या उत्कृष्ट कार्य करणाऱ्या सहयोगिनींचा सत्कार वृक्ष देऊन करण्यात आला. मेळाव्याचे सूत्र संचालन सविता भोंगाडे यांनी केले.
जिद्द व मेहनतीच्या बळावर प्रत्येक व्यक्ती व्यवसायात यशस्वी
By admin | Published: June 17, 2017 12:20 AM