डोंगरला येथे राज्य परिवहन विभागातील सेवानिवृत्त चालक कुंडलिक लंबूजी राऊत (६७) राहत होते. त्यांची पत्नी यशोदा राऊत (६१) यांचे रविवारी रात्री ८ च्या सुमारास ब्रेन हॅमरेजने निधन झाले. पत्नीच्या निधनामुळे कुंडलिक राऊत यांनी हंबरडा फोडला. तेही काही दिवसांपासून अर्धांगवायूने पीडित होते. मृत्यूमुळे ते एकाकी पडून यानंतर आपली देखभाल कोण करणार, या विचाराने त्यांना ग्रासले. अंथरुणावर असलेल्या कुंडलिक यांच्या मनात काहूर माजले. सोमवारी सकाळी ६ च्या सुमारास त्यांची अचानक प्रकृती बिघडली. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. यामुळे राऊत कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला.
मरेपर्यंत सोबत राहण्याच्या आणाभाका पती-पत्नी घेतात; परंतु पती व पत्नीपैकी एकाचा मृत्यू झाला, तर दुसरा एकटा पडतो. हा विरह अनेकांना सहन होत नाही. याची प्रचीती डोंगरला येथे आली. डोंगरला येथील स्मशान घाटावर एकाच वेळी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी अनेकांना अश्रू अनावर झाले. तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शंकर राऊत यांचे ते मोठे बंधू होत.