शेतकरी पुन्हा संकटात : महसूल विभागाचा उंटावरुन शेळ्या हाकण्याचा प्रकारदेवानंद नंदेश्वर भंडाराधानाचे कोठार समजल्या जाणाऱ्या भंडारा जिल्ह्यात पावसाचा अनियमितपणा, किडींचा प्रादुर्भाव आणि निर्सगाच्या प्रकोपामुळे धान पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यानंतरही जिल्हा प्रशासनाने ३० सप्टेंबरला घोषित केलेल्या खरीप पिकांची नजरअंदाज पैसेवारी ७२ पैसे घोषित केली आहे. परीणामी शेतकरी संकटात सापडणार आहे. सुरुवातीपासून जिल्ह्यात दुष्काळीस्थिती निर्माण झाली असताना परतीच्या पावसामुळे आता पिकांची स्थिती उत्तम कशी झाली, असा सवाल शेतकऱ्यांनी केला आहे.गत चार वर्षांपासून भंडारा जिल्हा निसर्ग प्रकोपाचा सामना करीत आहे. यावर्षी त्यात आणखी भर पडली. मृग आणि रोहणी नक्षत्र कोरडे गेल्याने पेरण्या लांबल्या. शेतकऱ्यांना दुबार, तिबार पेरणी करावी लागली. नंतरच्या काळात थोडा पाऊस बरसला. त्यानंतर पडलेल्या कडक उन्हामुळे पीक करपले. धानपिकावर किडींचा प्रादुर्भाव वाढला आहे. महागडी किटकनाशके खरेदी करुन पिक वाचविण्याचा शेतकरी धडपड करीत आहेत. आठवडाभरापासून परतीच्या पावसाने सुरुवात केली. मात्र या पावसामुळे हलक्या धानाची नासाडी होत आहे. शेतकऱ्यांवर बिकट परीस्थिती ओढावली आहे. कर्जाची परतफेड कशी करायची, असा प्रश्न त्यांना पडला आहे. महसूल विभागाने घोषित केलेल्या नजरअंदाज पैसेवारीत पिक स्थिती उत्तम दाखवून शेतकऱ्यांच्या जखमेवर मिठ चोळण्याचा प्रयत्न केला आहे. जिल्ह्यातील ८९१ एकूण गावांपैकी ८४६ गावांमध्ये खरीप पिकांची लागवड करण्यात आली. या गावांच्या खरीप पिकांची पैसेवारी जाहिर करण्यात आली. सर्व ८४६ गावांची पैसेवारी ५० पैसेपेक्षा जास्त दाखविण्यात आली. यावर्षी जिल्हा प्रशासनाने धान उत्पादक शेतकरी संकटात असतानाही नजर अंदाज आणेवारी ७२ पैसे दाखवून शेतकऱ्यांवर अन्याय केल्याचा आरोप करुन महसूल विभागाने उंटावरुनच शेळ्या हाकलण्याचा प्रकार केल्याचे दिसून येते.८९१ गावांपैकी ४५ गावांची पैसेवारी अघोषित४५ गावांमध्ये पिक नसल्यामुळे व रबी गावे असल्यामुळे त्या गावांची पैसेवारी जाहिर करण्यात आली नाही. यात ३५ गावे खरीपाची व १० गावे रबी पिकाची आहेत. १० रबी पिकांची पेरणी केलेली गावे ही भंडारा जिल्ह्यातील एकमेव पवनी तालुक्यातील आहेत. खरीप पिकांच्या गावांमध्ये भंडारा तालुक्यातील १७, तुमसर तालुक्यातील ८, पवनी ६, साकोली दोन, तर लाखनी तालुक्यातील दोन गावांचा समावेश आहे.
खरीपाची नजरअंदाज पैसेवारी @ ७२
By admin | Published: October 02, 2016 12:26 AM