भंडारा : सख्खी मोठी बहीण व लहान जावयाने मित्राच्या मदतीने कांद्री येथील तरुणाचा दगडाने ठेचून खून केल्याचे पुढे आले आहे. नात्याला काळिमा फासणाऱ्या या घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी अवघ्या चार तासांत तीन आरोपींना जेरबंद केले असून, पोलिसांपुढे त्यांनी खुनाची कबुली दिली.
मोठी बहीण मनीषा ईश्वर चुधरे (३०), रा. कांद्री, लहान जावई हितेंद्र रतिराम देशमुख (२९) आणि प्रेम उमाचरण सूर्यवंशी (२२), रा. जांब, ता. मोहाडी अशी आरोपींची नावे आहेत. रोशन रामू खोडके (२८), रा. कांद्री असे मृत तरुणाचे नाव आहे. गुरुवारी त्याचा दगडाने ठेचलेल्या अवस्थेत बोंद्री ते पांजरा रस्त्यावरील नाल्यात मृतदेह आढळून आला होता.
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट दिली. रोशनचा खून झाल्याचे निष्पन्न झाले. मात्र, खून कोणी केला हे मात्र पुढे येत नव्हते. ठाणेदार सुरेश मट्टामी यांनी या प्रकरणाचा तपास करून अवघ्या चार तासांत रोशनची मोठी बहीण, लहान जावई आणि जावयाचा मित्र या तिघांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता तिघांनी खून केल्याची कबुली दिली. त्यावरून पोलिसांनी अटक करून त्यांच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
दुचाकीने नेऊन दारू पाजून केला खून
रोशन हा मद्याच्या आहारी गेला होता. तो नेहमी मोठ्या बहीण व जावयाला त्रास देत होता. शिवीगाळ करून जिवे मारण्याच्या धमक्या देत होता. त्यामुळे मनीषा व तिचा पती ईश्वर नेहमी संतापलेले असायचे. यातूनच मनीषाने आपल्या सख्ख्या भावाचा काटा काढण्याचे ठरविले. लहान जावई व त्याच्या मित्राच्या मदतीने खून करण्यात आला. बुधवारी सायंकाळी त्याला दुचाकीवरून पांजरा शेतशिवारात नेले. तेथे त्याला दारू पाजून गळा दाबला. एवढेच नाही तर त्याच्या डोक्यात मोठा दगड टाकला. त्यात तो ठार झाल्यानंतर त्याला तलावात फेकले, अशी कबुली दिली.
रोशन बहिणीकडेच झाला लहानाचा मोठा
रोशन खोडके याचे आई-वडील लहानपणीच मरण पावले. त्यामुळे त्याला मोठी बहीण मनीषा चुधरे आपल्या घरी घेऊन आली. अगदी लहानपणापासून तो मनीषाकडे राहत होता. मोलमजुरी करायचा. त्यातच त्याला दारूचे व्यसन लागले आणि या दारूनेच त्याचा घात केला.