युवराज गोमासे
भंडारा : मोहाडी तालुक्यातील करडी परिसरात मंगळवार दुपारी ४ वाजताच्या सुमारास आलेल्या चक्रीवादळासह गारपिटीने तसेच मुसळधार पावसाने अल्पावधीत होत्याचे नव्हते झाले. शेतातील सोलर कृषीपंप उखडून पाच ते दहा फुटावर फेकले गेले. सोलर पॅनल तुटले. शेकडो घरांवरील टिनपत्रे उडाले तर कौलारू घरांचे अतोनात नुकसान झाले.
पालोरा, करडी परीसरात गारपिटसह चक्रीवादळाचा तडाखा बसला. वादळी पावसाने शेकडो घरावरील टिनपत्रे उडाल्याने लाखो रूपयांचे नुकसान झाले. गारपिटीने गावठी कवेलू फुटल्या. अल्पावधीत गोरगरिबांच्या झोपड्या उद्धवस्त झाल्या. चक्रीवादळाचा तडाखा इतका भयानक होता की, बासांसह टिपपत्रे २०० ते ३०० फुटावर फेकले गेले. सुदैवाने कुणीही यात न सापडल्याने जीवीतहानी टळली.
घरावरील ताडपत्री उडाल्यात. लग्न समारंभातील स्टेज उडाले तसेच अन्नाची नासाडी झाली. मंडप डेकारेशन मालकाचे लाखोंचे नुकसान झाले. लग्न कार्यक्रमांचे तीनतेरा वाजले. पांजरा बोरी शिवारातील कृषी सोलरपंप उखडून पॅनल तुटल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले. शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले आहे. शेतशिवारांसह गावातील झाडे उन्मळली. झाडे रस्त्यावर कोसळल्याने रस्ते बंद पडले होते. विद्युत तारा तुटल्याने महावितरण कंपनीचे लाखोंचे नुकसान झाले. संपूर्ण करडी, पालोरा परिसरात रात्रभर अंधाराचे साम्राज्य पसरले होते. घरांवर झाडे कोसळल्याने घरातील साहित्यांची नासधूस झाली.२५ मजुर थोडक्यात बचावले
पालोरा येथील राजू भोयर यांच्या ओम नर्सरीमध्ये टिनाचे छताखाली २० ते २५ महीला मजूर बसले होते. परंतु, चक्रीवादळाने संपूर्ण टिनाचे शेड २०० फुटांवर उडाले. त्याखाली बसलेले मजुर सुदैवाने थोडक्यात बचावल्याने अनर्थ टळला. राजू भोयर यांच्या नर्सरीचे लाखोंचे नुकसान झाले. फळ, फुलझाडे व रोपवाटीकेची प्रचंड हानी झाली.१५ मिनिटाच्या गारपिट व वादळाने हाहाकार
करडी, पालोरा परिसरात गारपिट व चक्रीवादळासह मुसळधार पाऊस केवळ १५ मिनिटेच झाला. परंतु, चक्रीवादळासह मुसळधार पावसाचा वेग भयावह होता. त्यातच गारपिटीने नुकसानीची गती वाढविली. पालोरा बसस्थानक व बाजार परिसरातील झाडे कोसळली. विद्युत खांबांवर झाड पडल्याने खांब वाकला.प्रशासनाने करावी पाहणी
करडी, पालोरा परिसरात झालेल्या नुकसानीची जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी करावी. तहसीलदारांना पंचनाम्याचे आदेश द्यावे. तत्काळ नुकसान भरपाईसाठी उपाययोजना आखाव्यात. तलाठ्यांनी पंचनामा करून अहवाल वरिष्ठांकडे पाठवावा, तातडीने नुकसान भरपाईचे वितरण करण्यात यावे, अशी मागणी सरपंच शिल्पा तुमसरे व परीसरातील नागरीकांकडून होत आहे.