भंडारा : भयानक आणि भीषण शब्दही अपुरे पडतील अशी अवस्था भंडारा शहरालगतच्या गिराेला काेविड स्मशानभूमीत आहे. दरराेज २० च्या वर मृतदेहांवर अंत्यसंस्कार केला जात असतांना काही मृतदेह अंत्यसंस्कारासाठी प्रतीक्षेत असतात. शवागारातील मृतदेहावर तत्काळ अंत्यसंस्कार व्हावे, यासाठी नातेवाईकांची तगमग रुग्णालय परिसरात दिसून येते. मात्र प्रशासकीय यंत्रणा हतबल झाली असून नातेवाईकांच्या आक्राेशाने वातावरण भेसूर हाेते. भंडारा जिल्ह्यात काेराेना संसर्गाचे तांडव सुरु असून दरराेज हजार ते १२०० व्यक्ती पाॅझिटिव्ह येत असून सरासरी १० ते पंधरा जणांचा काेराेनाने मृत्यू हाेत आहे. जिल्ह्यात कुठेही काेराेनाने मृत्यू झाला तरी अंत्यसंस्कार मात्र प्रशासनाने तयार केलेल्या भंडारा लगतच्या गिराेला येथील स्मशानभूमीतच केले जातात. जिल्ह्यात दुसरी कुठेही काेविड स्मशानभूमी नसल्याने संपूर्ण ताण यंत्रणेवर येताे. शासकीय रुग्णालयात काेराेनाने मृत्यू झाला की, मृतदेह शवागारात पाठविला जाताे. तेथे क्रमांक देऊन अंत्यसंस्कारासाठी तयारी केली जाते. अलीकडे स्मशानभूमीच्या क्षमतेपेक्षा अधिक मृत्यू हाेत असल्याने अनेक मृतदेह अंत्यसंस्काराच्या प्रतीक्षेत दिसतात. मृतदेहावर तत्काळ अंत्यसंस्कार व्हावा अशी अपेक्षा प्रत्येक नातेवाईकांची असते. त्यातूनच मग आक्राेशासाेबत राेषही व्यक्त हाेताे. काेविड नियमानुसार मृतदेह शववाहिनीतून गिराेला येथे नेला जाताे. तेथे काेविड नियमानुसार अंत्यसंस्कार केला जाताे.
गिराेला स्मशानभूमीत प्रशासनाने १४ ओटे अग्निसंस्कारासाठी तयार केले आहेत. मात्र दरराेज २० ते २५मृतदेहांवर अंत्यसंस्कार करावे लागत असल्याने ओटे कमी पडत आहे. त्यामुळे आता माेकळ्या मैदानात सरण रचून अंत्यसंस्कार केले जात आहे. धगधगत्या चिता पाहून तेथे काम करणारे अधिकारी, कर्मचारी भीषण वास्तव दरराेज अनुभवत आहे.
बाॅक्स
दिवसाला दाेन ट्रक लाकडे
गत दहा दिवसांपासून २० ते २५ मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले जात असल्याने दाेन ट्रक लाकडे दरराेज लागत आहे. नगर परिषदेचे चार कर्मचारी सरण रचण्याचे काम करतात. ट्रकमधून लाकूड काढून सरण रचणे आणि इतर विधी पार पाडण्याचे कामही त्यांनाच करावे लागते. पहिल्या दिवशी अंत्यसंस्कार झालेल्या मृतदेहाची रक्षा गाेळाही करावी लागते. संबंधित मृताचे नातेवाईक आले तर त्यांच्या सुपूर्द रक्षा केली जाते. परंतु कुणीच आले नाही तर या रक्षेची विल्हेवाट नगर परिषदेलाच लावावी लागते. रक्षा उचलल्यानंतर ओटे पाण्याने स्वच्छ केले जातात.
बाॅक्स
नातेवाईकांना मुखदर्शन
शवागारापासून ते स्मशानभूमीपर्यंत मृतदेह नेण्यासाठी नगर परिषदेचे चार कर्मचारी अहाेरात्र कार्यरत आहे. शवागारातून मृतदेह बाहेर काढून नातेवाईकांना मुखदर्शन दिले जाते. त्यानंतर मृतदेहाला सॅनिटाईज करुन शववाहिनीद्वारे गिराेलाकडे नेले जाते. तेथे सर्व अंत्यसंस्काराचे विधी हे चाैघेच पार पाडतात. मात्र कुणी नातेवाईक मुखाग्नी देण्यासाठी तयार असेल तर पीपीई किट देऊन अंत्यसंस्कार पार पाडले जातात.
बाॅक्स
स्मशानभूमीच्या कंपाऊंडला जाळी
गिराेला येथील स्मशानभूमीबाबत परिसरातील गावातील नागरिकांच्या तक्रारी हाेत्या त्यावरुन प्रशासनाने संपूर्ण काेविड स्मशानभूमीच्या कंपाऊंडला आता तारांची जाळी लावली आहे. त्यामुळे काेणताही प्राणी आतमध्ये जाणार नाही याची दक्षता घेतली जाते.