या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचून राहत असल्याने, अपघातांची शक्यता बळावली आहे. केसलवाडा हे गाव मिनी बाजारपेठ असल्यामुळे येडमाकोट, सेलोटपार, मुरपार, लेदडा व बयवाडा या गावातील लोकांची नेहमीच ये-जा सुरू असते. रस्ता उखडल्यामुळे या मार्गावर सुरू असलेली केसलवाडामार्गे तिरोडा ते तुमसर ही तिरोडा आगाराची बस मागील बऱ्याच दिवसांपासून बंद आहे. परिणामी, प्रवाशांना फारच त्रास सहन करावा लागत आहे. या उखडलेल्या रस्त्यावर केव्हाही अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशात काही विपरित घडले, तर त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न आता निर्माण झालेला आहे.
केसलवाडा येथे शासकीय पशुवैद्यकीय रुग्णालय असल्यामुळे येडामाकोट येथील लोकांना केसलवाडा येथे नेहमी यावे लागते. अशा स्थितीत प्रवास करायला फारच त्रास सहन करावा लागत आहे. एकीकडे देशात फोर-वे व सिक्कवेचे काम सुरू असताना ग्रामीण भागातील रस्त्यांची अशी दुरवस्था का? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.