लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: कामकाजातील ‘अनियमित’ता आणि विविध कारणांनी चर्चेत असलेल्या खामगाव आगार व्यवस्थापकांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले. विभाग नियंत्रकांनी तडकाफडकी ही कारवाई केली. याकारवाईमुळे एटी विभागात खळबळ उडाली आहे. खामगाव आगारातील गलथानपणा ‘लोकमत’नेच चव्हाट्यावर आणला होता, हे येथे उल्लेखनिय!
खामगाव बस स्थानकावरील शटल सेवेची जागेवरील बुकींग बंद करण्याचे आदेश विभाग नियत्रंकांनी दिले होते. मात्र, वरिष्ठांच्या आदेशाच्या पायमल्ली करीत खामगाव बस स्थानकात शटल सेवेची बुकींग सुरू ठेवणे. या सेवेच्या ठिकाणी मर्जीतील वाहकांची नियुक्ती करणे. यासोबतच कार्यालयीन कामकाजातील अनियमितता आणि इतर कारणांमुळे चर्चेत असलेले आगार व्यवस्थापक आर.आर. फुलपगारे यांना तात्काळ सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले आहे. यासंदर्भातील आदेश विभाग नियत्रंक सं.श.रायलवार यांनी १२ सप्टेंबर रोजी पारीत केला आणि आगार व्यवस्थापकांचा प्रभार स्थानक प्रमुख योगेश वांदे यांच्याकडे सोपविला. दरम्यान, शटल सेवेच्या जागेवरील बुकींग संदर्भात शेगाव येथील आगार व्यवस्थापकांवरही कारवाईची कुºहाड कोसळणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे एसटी विभागात एकच खळबळ उडाली आहे.
महिला वाहकांनी घातला होता घेराव!
शटल सेवेच्या जागेवरील बुकींगच्या ठिकाणी मर्जीतील वाहकांची वारंवार ड्युटी लावल्याप्रकरणी महिला वाहकांनी आगार व्यवस्थापकांना घेरावही घातला होता. यासंदर्भात वरिष्ठांकडे तक्रार आली होती.
लोकमतचा पाठपुरावा!
खामगाव आगारातील गलथानपणा आणि महिला वाहकांच्या समस्यांना सर्वप्रथम ‘लोकमत’ने वाचा फोडली होती. शटल सेवेवरील मर्जीतील वाहकांच्या ड्युटीचेही प्रकरण ‘लोकमत’नेच चव्हाट्यावर आणले होते.
खामगाव येथील आगार व्यवस्थापक आर.आर. फुलपगारे यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले आहे. त्यांचा प्रभार स्थानक प्रमुख वांदे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
- सं.श.रायलवार, विभाग नियत्रंक, बुलडाणा.