लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : आगामी खरीप हंगामासाठी कृषी विभागाने नियोजन केले असून यंदा १ लाख ९२ हजार हेक्टरवर खरीपाची पेरणी होणार आहे. त्यासाठी ४५ हजार क्विंटल बियाण्यांची मागणी नोंदविण्यात आली असून ८६ हजार क्विंटल खतांचे आवंटन प्राप्त झाले आहे.यावर्षी हवामान खात्याने चांगल्या पावसाचे भाकीत वर्तविले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये उत्साह दिसत आहे. लवकरच खरीप हंगामाला सुरुवात होईल. जिल्ह्यात २ लाख ३ हजार ६३९ हेक्टर खरीपाचे क्षेत्र आहे. तर ४६ हजार ६१० हेक्टर रबी क्षेत्र आहे. २०१८-१९ मध्ये जिल्ह्यात ७४.६१ मिमी सरासरी नोंद झाली. आता खरीप हंगाम २०१९-२० साठी कृषी विभागाने नियोजन केले आहे. १ लाख ९२ हजार ६५० हेक्टरचे नियोजन करण्यात आले. यात खरीप धान १ लाख ८० हजार हेक्टर, तुर १२ हजार १०० हेक्टर, सोयाबीन ५०० हेक्टर आहे.भातपिकासाठी ४३ हजार ७३९ क्विंटल बियाणे, तुरीचे ८६५ क्विंटल आणि सोयाबीनच्या ३५० क्विंटल बियाण्यांची मागणी नोंदविण्यात आली आहे.खरीप हंगामासाठी रासायनिक खतांचे नियोजन करण्यात आले आहे. यात युरिया ३८ हजार ७४० क्विंटल, डीएपी १० हजार ६३० क्विंटल, एसएसपी ११ हजार ३१० क्विंटल, एमओपी २ हजार ९८० क्विंटल व संयुक्त खते २३ हजार ४४० क्विंटल असे ८६ हजार १०० क्विंटलचे आवंटन आहे.४१४ कोटींचे पीक कर्ज२०१९ च्या खरीप हंगामासाठी पीक कर्ज वाटपाचे नियोजन करण्यात आले आहे. ९८ हजार २६० सभासदांना ४१४ कोटी ५० लाख रुपयांच्या कर्ज वाटपाचे नियोजन आहे. २०१८-१९ मध्ये ६९ हजार ४२४ सभासदांना ३३४ कोटी ७६ लाखांचे पीक कर्ज वितरीत केले होते. यात राष्ट्रीयकृत बँका, ग्रामीण व जिल्हा सहकारी बँकेचा समावेश आहे. खरीप हंगाम २०१८ मध्ये आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत ६७ धान केंद्रांवर खरेदी करण्यात आली. ४७ हजार ४७३ शेतकऱ्यांकडून १५ लाख २० हजार ६१० क्विंटल धान खरेदी करण्यात आला. यासाठी २६६ कोटी १० लाख रुपयांचे चुकारे देण्यात आले.खरीप हंगामपूर्व आढावा बैठकखरीप हंगाम पूर्व आढावा बैठक जिल्हाधिकारी शांतनू गोयल यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी घेण्यात आली. यावेळी पावसाचा चांगला अंदाज असल्याने कृषी विभागाने योग्य नियोजन करावे असे आवाहन करण्यात आले. बैठकीला अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पवार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी हिंदूराव चव्हाण, जिल्हा उपनिबंधक मनोज देशकर, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक रत्नाकर खांडेकर, कृषी विस्तार अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत पीक कर्ज वाटप पीएम किसान योजना, जलयुक्त शिवार आदींचा आढावा घेण्यात आला.
एक लाख ९२ हजार हेक्टर खरीप नियोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2019 12:28 AM
आगामी खरीप हंगामासाठी कृषी विभागाने नियोजन केले असून यंदा १ लाख ९२ हजार हेक्टरवर खरीपाची पेरणी होणार आहे. त्यासाठी ४५ हजार क्विंटल बियाण्यांची मागणी नोंदविण्यात आली असून ८६ हजार क्विंटल खतांचे आवंटन प्राप्त झाले आहे.
ठळक मुद्दे४५ हजार क्विंटल बियाणे : ८६ हजार क्विंटल खताचे आवंटन