नागरिकांमध्ये संताप : प्रशासनाची भूमिका असहकाराचीप्रशांत देसाई भंडाराप्रत्येक गावातील मृतात्म्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमीची जागा राखीव ठेवण्यात आली आहे. मात्र शहरालगत असलेल्या खोकरला येथील स्मशानभूमीवर काही व्यक्तींनी अक्षरश: संरक्षण भिंत बांधून अतिक्रमण केले आहे. यामुळे येथे अंत्यसंस्कारांसाठी जाणाऱ्यांना मार्ग नसल्याने तारेचे कुंपण व भिंतीतून निमुळता मार्ग बनवून येथून मृतात्म्याला नेले जाते. यामुळे मृत्यूनंतरही मानवाची अवहेलना होत असल्याची विदारक स्थिती खोकरल्यात बघायला मिळत आहे. शहरालगतच्या खोकरला ग्रामपंचायतीची लोकसंख्या जेमतेम ६ हजार ५०० च्या घरात आहे. या ग्रामपंचायतीची सदस्य संख्या नऊ असून येथे भाजप प्रणित सरपंच आहे. या गावाचा स्मशानभूमीसाठी गावातीलच एकेकाळचे दानशूर श्री धांडे यांनी त्यांचा हिस्सातील गट क्रमांक १२१/१ मधील ६३ आर म्हणजे १.५३ एकर जमीन गावाला दान दिली होती. त्यातील काही जागेत गावची ढोरबोडी आहेत. काही वर्षापर्यंत खोकरला येथील नागरिक या स्मशानभूमीत गावातील मृत व्यक्तींचा अंत्यसंस्कारांचा कार्यक्रम पार करीत होते. मात्र काही वर्षाच्या कालावधीनंतर तत्कालीन तलाठी पठाण यांच्या कार्यकाळात अनेकांनी स्मशानभूमीलगतच्या जमिनी विकत घेतल्या. यावेळी स्मशानभूमीच्याही जागेचा ताबा काही धनदांडग्यांनी घेतला. एवढेच नव्हे तर त्यांनी स्मशानभूमीचा जागेवर चौफेर संरक्षण भिंत उभी केली. यामुळे स्मशानभूमीची वहीवाटीनुसार असलेली हद्द व रस्ता संरक्षण भिंतीत गडप केली. यामुळे स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी जाण्याचा मार्ग पूर्णत: बंद करण्यात आला आहे. यामुळे अंत्यसंस्काराला जातांना नागरिकांना संरक्षण भींत फोडून किंवा काटेरी कुंपण तोडून जावे लागते. यावर लगतचा जमिन मालकांने आक्षेप घेवून पुन्हा भींत चालविली आहे. त्यामुळे येथे अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सदर स्मशानभूमीची हडप केलेली जमीन परत मिळवून द्यावी व मृतात्म्याला शांती मिळावी हिच खोकरला वासियांची मागणी आहे.
खोकरला येथे मृतदेहालाही ‘नरकयातना’
By admin | Published: May 12, 2016 12:44 AM