मोफत औषधीचे वितरण : देवरीत शेतकऱ्यांच्या मदतीला धावले कृषी केंद्र चालक चुल्हाड (सिहोरा) : सिहोरा परिसरातील देवरी (देव) गावाच्या शेत शिवारात उन्हाळी धानपिकावर खोडकिडा या किड्यांचा प्रादुर्भाव वाढला आहे. या शेतकऱ्यांच्या मदतीला कृषी केंद्र चालक धावून आले असून मोफत औषधीचे वितरण करण्यात आले आहे. वैनगंगा नदी काठावर असलेल्या देवरी (देव) येथील प्रगती शील शेतकरी दिलीप पटले यांनी २ एकर शेतीत उन्हाळी धानपिकाची रोवणी केली आहे. उन्हाळी धानपिकाला खोडकिड्याने फस्त केले आहे. यामुळे शेतकरी चिंतातूर झाला आहे. संपूर्ण धानाचे पिक फस्त होताना पाहताना शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आहेत. खोडकिड्यांची वाढत्या प्रादूर्भावाची माहिती शेतकऱ्यांनी पात्रे कृषी केंद्राचे संचालक तपेश पात्रे यांना दिली. या धान पिकांची पाहणी करण्यात आली असता ९० टक्के धानाची नासाडी झाल्याचे निदर्शनात आले आहे. धानपिकाचे उत्पादन होणार किंवा नाही असे दिसून आले आहे. या धानपिकाची माहिती तपेश पात्रे यांनी एका औषध वितरण कंपनीच्या व्यवस्थापक मंडळाला दिली आहे. या कंपनीची चमू शेतकऱ्यांच्या शेत शिवारात दाखल झाली. कंपनीच्या चमूने तब्बल दोन दिवस धान पिकांची पाहणी केली. यात किशोर डांबरे, तालुका समन्यवक हरिष बिनझोडे, सेवानिवृत्त शिक्षक पी.पी. गौतम आणि पात्रे कृषी केंद्राचे संचालक तपेश पात्रे यांनी शेतीत असणाऱ्या धानपिकांची पाहणी केली. धान पिकाला जीवंत ठेवण्यासाठी प्रायोगिक तत्वावर औषध वितरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. धान पिकांचे उत्पादन पूर्ववत करण्यासाठी शेतकऱ्यांना मोफत औषधीचे वाटप करण्यात आले आहे. चुल्हाड शिवारात धानपिकांना चांदपूर जलाशयाचे उन्हाळी धानपिकाचे लागवडीकरिता पाणी वाटप करण्यात येत आहे. ७०० हेक्टर आर हून अधिक धान पिकांची लागवड करण्यात आली आहे. पाणी वाटप होत असल्याने लागवड क्षेत्र वाढविण्याची शक्यता आहे. दरम्यान या धानावर किडींचा वाढता प्रादूर्भाव शेतकऱ्यांत भीती आणि चिंता निर्माण झाली आहे. याशिवाय सिंचीत कृषी पंपांना १२ तास थ्री फेज वीज पुरवठा करण्यात येत आहे. यामुळे उन्हाळी धानपिकांचे वाढते क्षेत्र आहे. ४ हजार हेक्टर आरपेक्षा अधिक क्षेत्रात उन्हाळी धानपिकांची रोवणी करण्यात आली असल्याची माहिती आहे. (वार्ताहर)
खोडकिडीने उन्हाळी धानपीक फस्त
By admin | Published: March 17, 2017 12:27 AM