भंडारा: मागील ५ महिन्यांपूर्वी एका अल्पवयीन बालिकेवर अत्याचार करून पुन्हा गेल्या चार दिवसांपूर्वी अन्य दोन साथीदारांच्या मदतीने अपहरण करून मारपीट केल्याच्या आरोपाखाली तीन आरोपींविरोधात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांना विशेष सत्र न्यायालयाने पुढील १५ दिवसांपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
पीडित अल्पवयीन बालिकेच्या आईच्या तक्रारीनुसार, ही घटना मागील १४ जुलै ते १२ डिसेंबरच्या सुमारास घडली आहे. आईच्या तक्रारीवरून दिघोरी मोठी पोलिसांनी गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील बोरटोला येथील सम्यक पुरुषोत्तम मेश्राम (वय १९), चालना येथील प्रज्वल सांगोळे (२०) व बाकटी येथील अमित खोब्रागडे (२१) नामक आरोपींविरोधात अपहरण करून अत्याचाराच्या विविध कलमांसह पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून तिन्ही आरोपींना अटक केली होती. या घटनेचा पुढील तपास सहायक ठाणेदार हेमंत पवार करीत आहेत.
पोलिस सूत्रानुसार, लाखांदूर तालुक्यातील एका अल्पवयीन बालिकेवर घटनेतील सम्यक मेश्राम नामक आरोपीने मागील ५ महिन्यांपूर्वी बळजबरीने अत्याचार केल्याचा आरोप आहे. या आरोपीने पुन्हा गत चार दिवसांपूर्वी शाळेत जात असलेल्या त्याच बालिकेचे अन्य २ साथीदारांच्या मदतीने अपहरण केले, नंतर मारपीट करून परत सोडल्याचाही आरोप तक्रारीत आहे.
आईच्या तक्रारीवरून दिघोरी मोठी पोलिसांनी घटनेतील तिन्ही आरोपींविरोधात अपहरण, अत्याचार व मारपिटीसह पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली होती. या कारवाईअंतर्गत आरोपींना १७ डिसेंबर रोजी पोलिसांनी जिल्हा विशेष सत्र न्यायालयात हजर केले असता गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन न्यायाधीशांनी तिन्ही आरोपींना पुढील १५ दिवसांपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली.