पावसाळ्याचे दिवस सुरू असले, तरी उन्ह-पावसाचा खेळ सुरू आहे. दिवसा कडक ऊन तापत आहे. गत तीन-चार दिवसांपासून रात्रीला दमदार पावसाची हजेरी लागत आहे. शनिवारी रोजी (ता.११) मध्यरात्रीनंतर पावसाला सुरुवात झाली. वीजपुरवठा खंडित झाला. काही वेळ पावसाच्या दमदार सरी बरसल्यानंतर पावसाची रिपरिप सुरू होती. मात्र, वादळ, वारा, विजेचा कडकडाट नसतानाही रात्रीला तब्बल साडेचार तास विद्युत प्रवाह बंद होता. नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
लाखनी तालुक्यातील किटाडी परिसरात जून महिन्यात मान्सूनपूर्व महावितरणने दुरुस्ती कामे हाती घेतली. विद्युत वाहिन्यांवर आडव्या येणाऱ्या झाडांच्या फांद्या छाटणे, झाडांच्या फांद्यांपासून विजेची तार मोकळी करणे. पावसाळ्याच्या दिवसात नियमितपणे विद्युत पुरवठा खंडित होण्याचा त्रास लक्षात घेता, विद्युत खांबावरील जुने फिडर (स्तोत्र) बदलले असून, त्याऐवजी नवीन फिडर बसविले आहे, जेणेकरून वीजप्रवाह खंडित न होता नियमितपणे सुरू राहील, असे तत्कालीन वीज तंत्रज्ञ नरेंद्र पचारे यांनी सांगितले होते. शनिवार रोजी रात्रीला दोन वाजताच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. काही वेळ मुसळधार पाऊस बरसला. परिणामी, वीजप्रवाह खंडित झाला. पावसाची रिमझिम सुरूच होती. साडेचार तासांनंतर वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला. महावितरणच्या निष्क्रिय कारभारामुळे ग्रामस्थांना रात्र अंधारात काढावी लागली.
मेघगर्जना, वादळ, वारा यामुळे अनुचित घटना टाळण्यासाठी वीजपुरवठा बंद करणे, ही बाब साहजिकच समजण्याजोगी आहे. मात्र, रिमझिम पावसात वादळी वारा, विजांचा कडकडाट नसतानाही वीजपुरवठा गायब होणे, हे मनस्ताप देणारे असून, न समजण्यापलीकडचे आहे. मोकळ्या वातावरणातही नियमितपणे वीजप्रवाह खंडित होत असल्याची ग्रामस्थांची ओरड आहे.
सध्या परिसरात शेतीची कामे सुरू आहेत. शेतकरी व मजूर वर्ग दिवसभर उन्हातान्हात राबत आहेत. दिवसभऱ्याचा थकवा घालविण्यासाठी त्यांना सुखाची झोप हवी असते. रात्रीला थकवा भागून झोपी जातात. मात्र, शनिवार रोजी साडेचार तास विद्युत प्रवाह खंडित झाल्याने गावकऱ्यांना विशेषतः बच्चे कंपनीला डासांचा उपद्रव सहन करावा लागला.
पालांदूर येथील महावितरण कार्यालयाच्या शेजारील कवडसी येथील खांबावर वीज पडल्याने इन्सुलेटर फुटले. पाऊस जोराचा व अंधार असल्याने रात्रीलाच इन्सुलेटर बदलविणे कठीण झाले. अगदी सकाळीच इन्सुलेटर बदलवून वीज सुरळीत करण्यात आली.
मयंक सिंग, सहायक अभियंता महावितरण कार्यालय पालांदूर.
अनिकेत भोयर, वीज तंत्रज्ञ पालांदूर.