पालांदूर : प्रशासनाच्या तंबीनंतरही लाखनी तालुक्यातील किटाडी येथे बुधवारी आठवडी बाजार भरविण्यात आला. कोरोना संसर्गाच्या सर्व नियमांना पायदळी तुडवत मोठी गर्दी करण्यात आली होती. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशालाही खो देण्यात आला. स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने पुन्हा काेरोना संसर्ग वाढण्याची भीती निर्माण झाली आहे.
लाखनी तालुक्यातील किटाडी येथे भाजीपाल्याची दुकाने दररोज निर्धारित वेळेत सुरू राहतात. दुचाकी चारचाकी वाहनातूनसुद्धा गल्लोगल्ली भाजीपाला विकला जातो. तरीही आठवडी बाजार भरल्याने परिसरात चिंतेचा विषय झालेला आहे. गावातील काही जागृत नागरिकांनी चिंता व्यक्त केलेली आहे. दुकानात फिजिकल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर दिसून येत नाही. आठवडी बाजारात भाजीपाल्याच्यासह चाहा, नास्ता, किराणा दुकाने निर्धारित वेळेनंतरही बिनधास्त सुरू होती. यामुळे मुख्य रस्त्यावरील वर्दळ वाढलेली असते. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे पालन व्हावे यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.