लाखनी तालुक्यातील किटाडी येथे भाजीपाल्याची दुकाने दररोज निर्धारित वेळेत सुरू राहत असूनही दुचाकी व चारचाकी वाहनातूनही गावात भाजीपाला विक्रीसाठी आणले जाते. जिल्हाधिकाऱ्यांनी निर्बंध शिथिल केले असले तरीही बाजार भरविण्याचे आदेश नसतानाही ९ जून बुधवार रोजी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन करीत आठवडी बाजार भरविण्यात आला होता. गर्दीमुळे सोशल डिस्टंसिंगचा फज्जा व मास्कचा वापर करण्याचा नागरिकांना विसर पडला. निर्धारित वेळेनंतरही मुख्य चौकातील संपूर्ण दुकाने व हाॅटेल्स सुरू ठेवण्यात आली होती. जणू काही कोरोनाच नष्ट झाल्याचा देखावा किटाडीच्या आठवडी बाजारात अनुभवायला मिळाला.
लोकमतच्या त्या वृत्ताची स्थानिक प्रशासनाने तत्काळ दखल घेतली. किराणा दुकानदार, हाॅटेल व्यावसायिक व भाजीपाला विक्रेते यांना समज दिल्यानंतर निर्धारित वेळेनंतर सर्व दुकाने व हाॅटेल बंद ठेवण्यात येत आहेत. बुधवार रोजी आठवडी बाजारही भरलेला नाही.