संतोष जाधवर
भंडारा : पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीचा परिणाम हा सर्वसामान्यांच्या जीवनावर होत आहे. वाढत्या पेट्रोल-डिझेलच्या दराने किराणा वस्तूही महागल्या असून भाजीपालाही महागल्याने अनेकांनी आपला मोर्चा कडधान्य तसेच डाळींकडे वळवला आहे. गेल्या काही दिवसापासून पेट्रोल आणि डिझेलचे दर सातत्याने वाढत आहेत. यावर सरकारने अंकुश ठेवण्याची गरज आहे. राज्यात विविध राजकीय पक्षांतर्फे पेट्रोल, डिझेल तसेच वाढलेल्या गॅसच्या किमती कमी करण्यासाठी आंदोलने, निषेध मोर्चे काढण्यात येत आहेत. मात्र तरीही सरकारने अद्याप दखल घेतली नसून गॅसचे दर जुलैच्या पहिल्याच आठवड्यात ८९५ रुपयांवर पोहोचले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांनी जगायचे तरी कसे असा प्रश्न अनेक गृहिणी विचारत आहेत. सर्वसामान्य कुटुंबातील गृहिणींना संसार करताना तारेवरची कसरत होत असून पैैसा आणायचा कोठून असा प्रश्न त्यांना सतावत आहे.
बॉक्स
ट्रॅक्टरची शेती महागली
जिल्ह्यात बैलाच्या साह्याने मशागतीचे प्रमाण कमी झाले आहे. पूर्वीप्रमाणे प्रत्येक शेतकऱ्याच्या दारात बैलजोडी आज दिसत नाही. त्यामुळे अनेकजण ट्रॅक्टरने शेती करतात. मात्र डिझेलच्या वाढलेल्या दराने ट्रॅक्टर मालकांनी मशागत, नांगरणी, पेरणीचे दरही वाढवले असल्याने ट्रॅक्टरची शेतीही महागली आहे.
कोट
व्यापारी यांची प्रतिक्रिया
गेल्या काही दिवसापासून महागाई वाढत चालली आहे. प्रत्येक वस्तूही पूर्वीच्या दरात मिळत नाही. यासोबतच सातत्याने पेट्रोल डिझेलचे दरही वाढत असल्याने शेती मशागतीचे दरही वाढले आहेत. सरकारने डिझेलचे दर कमी करुन बळीराजाला दिलासा देण्याची गरज आहे. यामुळे ट्रॅक्टरची शेती महागली आहे.
श्रीकांत वंजारी,परसोडी
कोर्
सध्या धान्याचे दर वगळता बाजारातील कोणतीही वस्तू महागली आहे. त्यामुळे आम्हाला मिळणाऱ्या दरापेक्षा दोन पैसे वाढवूनच आम्हाला ग्राहकांना विक्री करावी लागते. कोरोनामुळे अनेकांच्या अडचणी वाढल्या आहेत.
बॉक्स
डाळ स्वस्त, तेल महागले
किराणा वस्तूंमध्ये अनेक वस्तूंचे दर अव्वाच्या सव्वा वाढले आहेत. सरकारने दहा ते वीस रुपयांनी तेलाचे दर कमी केले असले तरीही अजूनही तेलाचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहेत. ते कमी करण्याची गरज आहे. त्या तुलनेत डाळीचे दर हे कमी आहेत. १२० ते १३० रुपयांवर उडीद, मूग डाळ व अन्य कडधान्य येत असल्याने अनेक जण भाजीपाला खरेदी करण्यापेक्षा डाळ व कडधान्य खरेदी करीत आहेत.
बॉक्स
कारले झाले ६० रुपये किलो
सध्या भाजीपाला बाजारात भाज्यांचे दर वाढले आहेत. भेंडी ३० रुपये किलो, टोमॅटो ३० रुपये किलो, पत्ताकोबी ५० रुपये किलो, फुलकोबी ५० रुपये किलो, यासोबतच पालेभाज्याही दहा ते पंधरा रुपयाला एक जुडी विक्री केली जात आहे.
कोट
घर चालविणे झाले कठीण...
आम्ही ग्रामीण भागातील महिला खूप काटकसर करतो. मात्र महागाई इतकी वाढली आहे की घर चालविणे दिवसेंदिवस कठीण होत आहे. सरकारने गोरगरिबांचा विचार करून वाढत्या महागाईवर अंकुश ठेवण्याची गरज आहे. गावातील महिलांसाठी सरकारने शेतीपूरक उद्योग उभारले पाहिजेत.
वंदना वैद्य, गृहीणी, खरबी नाका
कोट
मी घरकामासोबतच शेतीकामात मदत करते. मात्र गतवर्षी शेतीतील उत्पन्न झालेच नाही. त्यातच हा कोरोना आणि वाढलेली महागाई यामुळे संसार करताना महिलांना मोठी कसरत करावी लागत आहे. सरकारने मध्यमवर्गीयांचा विचार करून महागाईवर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे.
सुशीला गबने, गृहीणी, पांढराबोडी