मोहन भोयर
तुमसर: तुमसर तालुक्यातील पाथरी येथे बावनथडी नदीकाठावर सातपुडा पर्वतरांगातील रम्य परिसरात १२० वर्षे जुने गणेश मंदिर आहे. महाराष्ट्र व मध्य प्रदेशातील शेकडो भाविक येथे दर्शनाकरिता येतात. तुमसर येथील श्रीमंत उद्योगपती रायबहादूर दुर्गाप्रसाद सराफ यांनी या गणेशमंदिराची स्थापना केली होती. हा संपूर्ण निसर्गरम्य परिसर पर्यटनस्थळ म्हणून घोषित होण्याची प्रतीक्षा करीत आहे.
तुमसर तालुक्यातून बावनथडी नदी वाहते. या नदीकाठावर पाथरी येथे प्रसिद्ध जुने गणेश मंदिर आहे. या मंदिराची स्थापना १२० वर्षांपूर्वी करण्यात आली होती. येथील मूर्ती जयपूर येथून आणण्यात आली होती. संगमरवर दगडाची अशी पांढरी मूर्ती असून मध्य प्रदेश व महाराष्ट्रातील अनेक भाविक येथे दरवर्षी येतात. टेकडी असलेल्या भूभागावर हे मंदिर वसलेले आहे.
निसर्गरम्य परिसर असल्यामुळे येथे पर्यटक मोठ्या प्रमाणात येतात. त्यामुळे पर्यटनस्थळ घोषित करून विकास केल्यास एक उत्कृष्ट पर्यटनस्थळ म्हणून हे नावारूपाला येऊ शकते. माजी आ. अनिल बावनकर यांनी येथे सभामंडपाचे बांधकाम केले आहे. अनेक कुटुंबे येथे नदीकाठावर पिंडदान करण्याकरिता येतात. भाविकांची मनोकामना येथे पूर्ण होतात, अशी आख्यायिका आहे. या परिसरातील सर्वात जुने असे हे मंदिर असून, सदर स्थळ हे आजही उपेक्षित आहे.
मॅग्नीजचे भंडार : या संपूर्ण परिसरात मॅग्नेटचे भूगर्भात भंडार आहे. नागपूर जबलपूर रस्ता बांधकाम १९०२ मध्ये ब्रिटिश शासनाने सुरू केले होते. त्या वेळी रस्ता बांधकाम यादरम्यान खोदकामात काळा दगड मिळाला. या दगडाची माहिती ब्रिटिश गव्हर्नर यांना देण्यात आली. वैज्ञानिकांनी हा काळा दगड मेगनच्या असल्याची माहिती ब्रिटिशांना दिली होती. भंडारा, नागपूर व बालाघाट हा संपूर्ण परिसर सीपी अँड बेरार प्रांतमध्ये होता. त्याची राजधानी नागपूर होती.
त्यानंतर ब्रिटिशांनी तुमसर तालुक्यातील लहान रेल्वे ट्रॅक मिटेवाणी, चिचोली, गोबरवाही सितासावांगी, सुंदर टोला चिखला, राजापूर, नाका डोंगरी व मध्य प्रदेशातील बाम्हनीपर्यंत रेल्वे ट्रॅकचे बांधकाम केले. बावनथडी नदीवर मोठे पूल बांधण्यात आले. सन १९१० मध्ये रेल्वे ट्रॅकची निर्मिती करण्यात आली होती. तुमसर येथील श्रीमंत उद्योगपती रायबहादूर सेठ दुर्गाप्रसाद सराफ यांची फर्म भंडारा, नागपूर व बालाघाट जिल्ह्यात होती. उद्योगपती दुर्गाप्रसाद सराफ यांनी पाथरी येथे नदीकाठावर गणपती मंदिराची स्थापना केली होती. सदर मंदिर परिसर पर्यटनस्थळ घोषित केल्यास स्थानिक बेरोजगारांना येथे काम मिळून एक सुंदर पर्यटनस्थळ म्हणून नावारूपाला येण्याची शक्यता आहे.