गत काही दिवसांपासून लाखांदूर तालुक्यात कोविड चाचणी दरम्यान मोठ्या प्रमाणात कोरोना बाधित रुग्ण आढळून येत आहेत. तालुक्यातील काही गावात या रुग्णांचे प्रमाण अधिक असल्याने काही गावे स्थानिक प्रशासनाने प्रतिबंधीत केली आहेत. तथापि दोन महिन्यांपूर्वी लाखांदुरातील कोविड केअर सेंटर बंद झाल्याने अधिकतम रुग्ण गृहविलगीकरणात ठेवण्यात आल्याची माहिती आहे.
दरम्यान, मागील १० एप्रिल रोजी लाखांदूर येथे कोविड केंद्र उघडण्यात आले. साकोलीच्या उपविभागीय अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार कोविड सेंटरसाठी मुलींच्या शासकीय वसतिगृहाची प्रशासकीय इमारत अधिग्रहीत करुन केंद्र सुरु झाले. या केंद्रात बाधित रुग्णांसाठी जवळपास ५६ खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, या केंद्रात केवळ एकच ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध असल्याने ऐनवेळी अन्य रुग्णांना आवश्यक ऑक्सिजन उपलब्ध न झाल्यास अनेक बाधितांना ऑक्सिजनशिवाय जीव गमावण्याची वेळ येण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, बाधित रुग्णांवर औषधोपचार करतांना आरोग्य विभागांतर्गत आवश्यक फैबिफ्ल्यू नामक औषधी गोळ्यांचा पुरवठादेखील करण्यात आला नसल्याची ओरड आहे. एवढेच नव्हे तर राज्यात सर्वत्र रेमडेसिविर अँटीव्हायरल इंजेक्शनसाठी धावपळ होत असतानाच कोरोना प्रतिबंधक लसही या केंद्रात उपलब्ध नसल्याची प्रचंड ओरड आहे. एकूणच चार दिवसांपूर्वी स्थानिक लाखांदुरात कोविड केअर सेंटर सुरु करण्यात आले. मात्र, आतापर्यंत औषध सुविधांमुळे बाधित रुग्णांची गैरसोय होताना आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांना वैताग येऊन कोविड केअर सेंटर आजारी ठरल्याचा आरोप सर्वत्र केला जात आहे.
याप्रकरणी शासनाने तत्काळ दखल घेऊन कोरोना बाधित रुग्णांना आवश्यक औषधोपचार होण्यासाठी सर्व औषध सुविधा उपलब्ध करण्याची मागणी जनतेतून केली जात आहे.
बॉक्स
कोरोना प्रतिबंधक लसीकरणाकडे नागरिकांची पाठ
तालुक्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असतांना शासनाने गत काही महिन्यांपूर्वी तालुक्यात आरोग्य विभागाअंतर्गत कोवॅक्सिन कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध करुन देण्यात आली आहे. येथे काही प्रमाणात लसीकरण देखील करण्यात आले आहे. सदर लसीकरण ४५ वर्षांवरील वयोगटातील नागरिकांना करण्यात आले आहे. मात्र, अलीकडे कोरोना बाधित रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत असताना या लसीकरणाकडे नागरिकांनी पाठ फिरविल्याचे दिसून येत असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. कोरोना संसर्ग टाळण्यासाठी लसीकरण करुन घेणे अत्यावश्यक असल्याने ४५ वर्षे वयोगटापुढील सर्वच नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.