वाकेश्वर : क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या ज्ञानमय प्रकाशाने क्रांतिज्योती सावित्री घडल्यात. जे विचार देतात ते महान होतात. प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे त्यांच्या पत्नीचा हात असतो हे जरी सत्य असले तरी प्रत्येक यशस्वी महिलांच्या मागे त्यांच्या पतीचाही हात असतो, हे फुले दाम्पत्यांनी जगाला दाखवून दिले. सावित्रीबाईंच्या परिश्रमातून आज महिला अनेक पदावर पोहोचलेल्या आहेत, असे विचार गांधी विद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ॲड. आनंद जिभकाटे यांनी केले. पहेला येथील गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती उत्सव कार्यक्रमात ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य यामिनी बांडेबुचे ह्या होत्या. मुख्य मार्गदर्शक म्हणून ॲड. आनंद जिभकाटे हे होते. प्रमुख अतिथीमध्ये माजी सरपंच गायत्री बारस्कर, प्राचार्य डी. जी. काटेखाये, ज्येष्ठ शिक्षक व्ही. आर. मोटघरे उपस्थित होते.
या जयंती उत्सव कार्यक्रमात परिसरातील अनेक महिला बचत गट समाविष्ट झाले होते. त्यांची गीत गायन स्पर्धा व प्रश्नमंजूषा स्पर्धा घेण्यात आली. त्यात अनुक्रमे विद्या ठवकर, मंगला भांबोरे, गायत्री बारस्कर व चंदा नकाते (प्रश्नमंजूषा )यांनी क्रमांक पटकाविला. कार्यक्रमात क्रांतिज्योती सावित्रीबाईंच्या जीवनचरित्राचा विद्यार्थी वेशभूषेतील संगीतमय देखावा सादर करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या मी सावित्रीबाई बोलतेय या उपक्रमासोबतच पहेला या गावातील माजी सरपंच आशाताई ठवकर व गायत्री बारस्कर या कर्तृत्ववान महिलांना तत्कालीन राष्ट्रपतीच्या हस्ते पहेला या गावाला पुरस्कार मिळवून दिल्याबद्दल महिला गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शिक्षिका पी. के. गिरडकर व एस आर मडावी यांनी सूत्रसंचालन केले. उपस्थित मान्यवरांचे आभार प्राची श्रीरंग यांनी मानले. वृक्षारोपण करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.