२०२१चा खरीप हंगाम यशस्वी करण्याकरिता व आधुनिक कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी कृषी विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या महत्त्वाच्या मोहिमांवर विशेष भर देऊन २१ जून ते २१ जुलै या कालावधित कृषी संजीवनी मोहीम यशस्वीपणे पार पाडली. १ जुलै रोजी महाराष्ट्राच्या हरित क्रांतीचे प्रणेते स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीदिनी साजऱ्या केल्या जाणाऱ्या कृषिदिनी कृषी संजीवनी मोहिमेचा समारोप होणार आहे.
नुकतेच कृषी विभागांतर्गत सन २०२०चा रब्बी हंगामाचे रब्बी, ज्वारी, गहू, हरभरा आणि करडई या पिकांसाठी सर्वसाधारण व आदिवासी गटासाठीचे पीक स्पर्धेचे विजेते जाहीर करण्यात आले. १ जुलै रोजी मुंबई येथे दुपारी १२.३० वाजता होणाऱ्या कृषिदिन कार्यक्रमामध्ये राज्यस्तरीय रब्बी हंगाम २०२० मधील प्रथम क्रमांकाच्या विजेत्या शेतकर्यांचा मुख्यमंत्र्यांच्या शुभ हस्ते सत्कार होणार आहे.
सदर कार्यक्रम राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महसूल मंत्री, कृषिमंत्री, फलोत्पादन मंत्री, कृषी राज्यमंत्री, फलोत्पादन राज्यमंत्री, सचिव (कृषी), आयुक्त (कृषी) यांच्या उपस्थितीत पार पाडला जाणार आहे. सदर कार्यक्रमाच्या वेळी राज्याचे मुख्यमंत्री हे कृषी विभागाच्या रिसोर्स बँकेतील शेतकऱ्यांशी थेट संवाद साधणार आहेत. सदर कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण कृषी विभागाचे यू-ट्यूब चॅनलवरून होणार असून, जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कृषी अधीक्षक हिंदुराव चव्हाण यांनी केले आहे.