साकोली : येथील नगर परिषदेत नियमित मुख्याधिकारी म्हणून कुलभूषण रामटेके यांनी मंगळवारला पदभार स्वीकारला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा महासचिव प्रभाकर सपाटे माजी सभापती मदन रामटेके यांनी मुख्याधिकारी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. याप्रसंगी राष्ट्रवादीचे ईश्वरदास भेंडारकर, राजू भुरे, सुनील गिडलानी, राहुल राऊत, लीलाधर हटवार व इतर पदाधिकारी उपस्थित होते. १४ सप्टेंबरला कुलभूषण रामटेके यांनी साकोली नगर परिषदेला भेट दिली होती, त्या वेळेस पदभार न घेता त्याच दिवशी रामटेके यांनी भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयात साकोली मुख्याधिकारी म्हणून नियुक्तिपत्र देऊन हजेरी लावली होती. मात्र पदभार न स्वीकारल्याने साकोली शहरात वेगळीच चर्चा रंगली होती. साकोली नगर परिषदेच्या कार्यभार रामटेके स्वीकारणार की नाही यावर संभ्रमाची परिस्थिती निर्माण झाली होती. रामटेके यांनी पदभार घेतल्याने त्या चर्चेला आता पूर्णविराम लागला आहे . रामटेके यापूर्वी वळसा नगर परिषदेचे मुख्याधिकारी होते तसेच प्रशासकीय सेवेच्या कार्यकाळात त्यांनी अहेरी नगर परिषदेत व मंत्रालय येथे सुद्धा कार्य केले आहे. नियमित मुख्याधिकारी लाभल्याने शहरातील रखडलेली विकासकामे मार्गी लागतील, अशी शहरवासीयांना अपेक्षा आहे.
कुलभूषण रामटेके यांनी साकोली नगर परिषदेचा पदभार स्वीकारला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 4:39 AM