साकोली (भंडारा) : येथील शेल्टर होममध्ये मुक्कामी असलेल्या मध्यप्रदेशातील एका मजुराचा अचानक मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. चंद्रपूर जिल्ह्यातील शिंदेवाही येथून आपल्या परिवारासह जात असताना शेल्टर होममध्ये मुक्कामी होता.
धरम दुबे पाचे (५०) रा. अत्री जि. बालाघाट, मध्यप्रदेश असे मृताचे नाव आहे. गुरुवारी दुपारी त्याला परिवारासह साकोलीच्या अपना घर या शेल्टर होममध्ये आणण्यात अाले. त्यावेळी त्याच्यासह सर्वांची वैद्यकिय तपासणी कारण्यात आली. तेव्हा तो तंदुरूस्त होता. रात्री भोजन करुन तो झोपी गेला. शुक्रवारी सकाळी त्याला उठविण्याचा प्रयत्न केला मात्र प्रतिसाद मिळाला नाही. ही बाब शेल्टर. होमच्या प्रमुखाला सांगितली. त्यांनी डाॅक्टरांना पाचारण केले, तेव्हा डाॅक्टरांनी मृत घोषित केले. त्याचा मृत्यू नेमका कशाने झाला हे कळू शकले नाही.