लाखांदूर : कोरोना संसर्ग वाढत असल्याने लाखांदूर येथे कोविड सेंटर सुरू करण्यात आले. परंतु येथे कोणत्याही सुविधा नाहीत. त्यामुळे उपचारासाठी भंडाऱ्याकडे धाव घ्यावी लागते. येथे ऑक्सिजनसह सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष रमेश डोंगरे यांनी केली आहे.
जिल्हा मुख्यालयापासून शेवटच्या टोकावर असलेल्या लाखांदूर तालुक्यात कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. त्यामुळे ९ एप्रिल रोजी शासकीय मुलींच्या वसतिगृहात कोविड सेंटर सुरू केले. परंतु येथे ऑक्सिजनसह कोणतीही सुविधा नाही. त्यामुळे रुग्णांना भंडारा येथे पाठविले जाते. तेथे जाण्यासाठी दोन तास लागतात. यात प्रकृती चिंताजनक होऊ शकते. त्यामुळे लाखांदूरच्या कोविड केअर सेंटरमध्ये ऑक्सिजन व इतर सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी डोंगरे यांनी केली आहे.