लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शहरातील बहुतेक भागातून पार्किंगच गायब झाले आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला दुचाकी व चारचाकी वाहने उभी राहत असल्यामुळे रस्त्यांचा आकार लहान झाला असून, त्यामुळे वाहतुकीची कोंडी ही नेहमीचीच समस्या ठरलली आहे. बाजारपेठांमध्ये वाहन घेऊन जाणे कठीण झाले असून, बहुतेक वाहने ही नो पार्किंगमध्ये उभी राहत असल्याने वाहतूक कोंडीत भर पडत आहे. परिणामी, नागरिकांना हकनाक भुर्दंड सहन करावा लागत आहे. अरूंद रस्ते आणि वाहतुकीची कोंडी ही समस्या काही भंडारावासींना नवीन नाही; मात्र सातत्याने होणारा वाहतुकीची कोंडी डोकेदुखी वाढविणारा विषय ठरत आहे. गांधी चौक ते बसस्थानकापर्यंत शहरातील प्रमुख बाजारपेठ आहे.या मार्गावर कापड, सराफा, फर्निचर, हॅन्डलूम, सजावट, सौंदर्य प्रसाधने, इलेक्ट्रॉनिक्स शॉप व इतर प्रमुख वस्तूंचे मार्केट आहे. अतिक्रमणामुळे या भागातील रस्ते अरूंद आहेत. त्यात हातगाडीवर साहित्य घेऊन विक्री करणारे फेरीवाले, फुटपाथ विक्रेते यांची भर पडली आहे. त्यामुळे दुकानात येणाऱ्या ग्राहकांना आपली वाहने ठेवण्यासाठी जागा उरत नाही. रस्त्यालगत अस्ताव्यस्त पद्धतीने वाहने उभी करून ठेवली जातात. त्यामुळे तुरळक अपघात, मिनटा मिनटाला ट्रॅफिक जाम होत असते. याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.
रुग्णांनाही बसताे फटका- शहरातील मेनरोडवर बेशिस्त पार्किंगचा फटका सामान्य नागरिकांसह रुग्णांनाही बसत असतो. गंभीर रुग्णांना रुग्णवाहिकेतून जिल्हा सामान्य रुग्णालयात आणण्यासाठी या रस्त्यावरून बिकट त्रासाला सामोरे जावे लागते. अनेकदा जाम लागत असल्याने या रुग्णवाहिकांना रस्त्यातून वाट काढणेही कठीण होते.
प्रतिष्ठानांमध्ये नाही पार्किंग- शहरातील बहुतांश प्रतिष्ठाने, बँका, खासगी कार्यालये, मार्केट व रुग्णालयांमध्ये जी पार्किंगची जागा आहे तिथे व्यावसायिक, कर्मचारी, डॉक्टर्स व अन्य कर्मचाऱ्यांची वाहने राहतात. त्यामुळे रुग्ण, ग्राहकांना नाइलाजाने रस्त्यावर वाहने उभी करावी लागतात. ही वाहने रस्त्यापर्यंत येत असल्याने वाहतुकीचा खोळंबा होत असतो. गांधी चौक ते मोठा बाजारापर्यंत कापड व्यावसायिकांची अनेक दुकाने आहेत. नेमके याच ठिकाणी पार्किंगची कुठेही सोय नाही.