गावात दर दिवसाला दुपारी दोन ते रात्री आठपर्यंत गुजरी भरत असल्याने गावातील व परगावातील ग्रामस्थांना यामुळे कसाबसा रोजगार मिळेल त्या ठिकाणी दुकाने थाटून बसतात. हे सत्य असले तरी त्या प्रत्येकाने कुठे आणि कशा प्रकारे दुकाने थाटायची वा थाटू नये, यासाठी कधीच प्रयत्न केला गेला नाही, हेही तितकेच महत्त्वाचे आहे. एकीकडे गावातील व्यवसाय, बाजार हा आता आधीसारखा राहिला नसल्याने प्रत्येक व्यावसायिक ओरडतो, तर दुसरीकडे आलेल्या ग्राहकांना आपली वाहने उभी करायलासुध्दा जागा उपलब्ध होत नाही. यात दोष द्यायचा तरी कुणाला?
गावातील मुख्य चौकात बँक एटीएम, पोस्ट ऑफिस असल्याने रोज हजारो ग्रामस्थ बाहेरगावाहून कामानिमित्त याठिकाणी येत असतात. पण त्याच ठिकाणी पार्किंगची सोय नाही तर मग येणाऱ्या प्रत्येकाने वाहन घरीच ठेवून यायचे का. हीच परिस्थिती येथे सर्वांना भेडसावत असते. पण, त्यावर उपाय आजपर्यंत ना ग्रामपंचायत प्रशासनाने काढला, ना संबंधितांनी. मग यात कधी कधी रस्ता जाम होऊन अनेकदा मारपीट, शिविगाळ होऊन नाहक त्रास सर्वांना सहन करावा लागतो. या रस्त्यावरून एखाद्याला रुग्णालयात अर्जंट जायचे झालेच तर ते शक्य नाही. त्यात पुन्हा भर पडते ती मोठमोठ्या जड वाहनांची. गावातील मुख्य गल्लीतील हा प्रकार आजचा नसून, अनेक वर्षांपासून वाढत चालला आहे. तो बसस्थानक परिसरातील का असेना. पण, जेव्हा हा प्रकार वाढत राहतो. विभाग प्रशासन बघ्याची भूमिका घेते आणि नाहक त्रास सर्वांनाच सहन करावा लागतो, तेव्हा यावर तत्काळ उपाययोजना आखणे गरजेचे झाले आहे.
गुजरी चौकात बँक, एटीएम आणि पोस्ट कार्यालय असून, पार्किंगसाठी जागा नसल्याने बऱ्याचदा या ठिकाणी दुचाकी वाहनांची तोबा गर्दी होते. त्यामुळे अनेकवेळा तंटे होतात. हे कधी बंद होणार, याकडेही कुणाचेच लक्ष नसल्याने ग्रामस्थांमध्ये असंतोष पाहायला मिळतो आहे.