लाखांदुर : मातृसत्ताक कुटुंबव्यवस्था असलेल्या सिंधू संस्कृतीच्या पाडावानंतर स्त्रियांची जी अवनती आणि अधोगती झाली त्यातून तिला दुय्यम स्थान देण्यात आले. तिचे हक्क व अधिकार नाकारून एकूणच ती एक जिवंत माणूस आहे, हे नाकारून ती फक्त उपभोग्य वस्तू आहे, हा विचार पुरुषसत्ताक व्यवस्थेमध्ये रुजवविण्यात आला. हा विचार पायदळी तुडवत ज्या माय-माऊल्यांनी तुमच्या अस्तित्वाची लढाई लढली. तुमच्या आयुष्यात सुख यावं म्हणून आपलं सर्वस्व पणाला लावलं, त्या जिजाऊ- सावित्रीच्या विचारांचं वाण एकमेकींना द्या आणि घ्या असे, प्रतिपादन संभाजी ब्रिगेडचे तालुका प्रवक्ता भारत गजापुरे यांनी केले. ते ढोलसर येथील एका कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.
तालुक्यातील ढोलसर या गावात नेहरू युवा केंद्र भंडारा आणि एकता नवयुवक बहुउद्देशीय सेवा मंडळ ढोलसरच्या संयुक्त विद्यमाने सामूहिक हळदी-कुंकू या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी यात महिला सक्षमीकरण व त्यांचे आरोग्य या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी के.व्ही. मेश्राम, आशा सुपरव्हायझर होत्या तर आजची युवती व क्रांतिज्योती या विषयावर ओ.बी.सी.विद्रोह फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आशिष भाऊ ठाकरे यांनी मार्गदर्शन केले. प्रमुख उपस्थितीत एम. बी. खोब्रागडे़ कविता मेंढे़ रेखा चुटे़ रूपाली नान्हे़ सरिता शिवरकऱ़ सुषमा रहेले़ संगीता दोनोडे़ ज्योती चुटे उपस्थित होत्या. यावेळी गावातील २४ बचत गटांच्या महिला व बहुसंख्य युवती उपस्थित होत्या. सूत्रसंचालन राष्ट्रीय युवा स्वयंसेवक जोशेष वाढई तर आशा स्वयंसेवीका संगीता बावणे यांनी आभार मानले.