लाखांदूर : आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशामन दलाची भूमिका फार महत्वाची असते. मात्र लाखांदूर तालुक्यात कुठेही अग्नीशामन दलाची नेमणूक झाली नसल्याने तालुक्यातील जनतेला अचानक लागणाऱ्या आगीपासून बचाव करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते. लाखांदूर तालुक्याची स्थापना होऊन बरेच वर्ष लोटले असले तरी या तालुक्यातील जनता अग्निशामन दलाच्या सुविधेपासून वंचित आहे. तालुक्यात कुठेही आग लागली तर भंडारा येथून अग्निशामन दलाचा ताफा येईपर्यंत आगीने रौद्र रुप धारण केलेले असते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात जिवीत हानी व वित्त हानीला तालुक्याच्या जनतेला सामोरे जावे लागले आहे. लाखांदूर तालुक्यात अनेक महत्वाची कार्यालये आहेत. सर्वच राजकीय पक्षांचे मोठे-मोठे पुढारी आहेत. मात्र या सर्वांना कधीच अग्निशामन दलाचे महत्व पटलेले दिसत नाही. अग्निशामन दलाचे महत्व पटले असते तर आजपर्यंत लाखांदूर तालुक्यात अग्निशामन दलाची स्थापना होऊन तालुक्यात घडणाऱ्या आगीच्या घटनांना आटोक्यात आणून वित्त हानी व जीवित हानी टाळता आली असती. लाखांदुरात अग्निशामन दलाची स्थापना करुन येथील जनतेचा आगीपासून संरक्षण करण्याची जबाबदारी स्वीकारावी.
लाखांदूरची जनता सेवेपासून दुर्लक्षित
By admin | Published: April 10, 2016 12:33 AM