२२ महिन्यानंतरही समस्या कायम : नगरपंचायतमध्ये समावेश करण्याची मागणी लाखांदूर/लाखनी : ग्रामपंचायतचे रूपांतर नगर पंचायतीत झाल्यानंतर २३ महिन्याचा कालावधी लोटला आहे. असे असताना ग्रामपंचायतमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांचा नगर पंचायतमध्ये समावेश तथा वेतनश्रेणी लागू न झाल्यामुळे नगरपंचायत कर्मचाऱ्यानी आज बुधवारला काम बंद आंदोलन केले. शासनाने राज्यात व तालुक्याच्या ठिकाणी लोकसंख्येच्या आधारे नवीन नगरपंचायती स्थापन केल्या. यापूर्वी ग्रामपंचायतमध्ये अनेक कर्मचारी स्थायी व अस्थायी स्वरूपात कार्यरत होते. नगरपंचायती अस्तित्त्वात आल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या कामाचा व्याप वाढला, त्यानुसार कर्मचाऱ्याची कमतरता भासू लागली, मात्र शासनाच्या आदेशानुसार नवीन कर्मचारी भरती, वेतनश्रेणी यासंदर्भात नगरविकास विभागाने अद्याप दखल घेतली नाही. नगरपंचायतींना स्थानिक संस्थानांतील पदाच्या आकृतीबंधास मान्यता देण्यात आली. मात्र नगरपंचायत तयार झाल्यानंतर निर्माण झालेली पदे अद्याप भरण्यात आलेली नाही. पदभरतीची कार्यवाही आदेश निर्गमित झाल्यापासून १ महिन्याच्या कालावधीत पूर्ण करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. परंतु आकृतीबंधानुसार पदभरती करण्यात आली नाही. नगरपंचायत कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांना कामे करण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत. लाखांदूर नगरपंचायतीमध्ये पाच स्थायी व पाच अस्थायी कर्मचाऱ्यांनी वेतनश्रेणी व नवीन पदभरती करण्याच्या मागणीला घेऊन काम बंद आंदोलन केले. लाखांदुरात कामबंद आंदोलनात विजय करंडेकर, बशीलाल सोनेकर, रमेश कापगते, अशोक शिंदे, विश्वनाथ कठाने, विश्वास बोरकर, संतोष राऊत, शुध्दोधन नहाले, सतीश माकडे, राजेश माकडे, राजेश सुखदेवे सहभागी होते. यावेळी मुख्याधिकारी डॉ.विशाखा शेळकी यांना निवेदन देण्यात आले. लाखनी येथे कामबंद आंदोलनामध्ये सुरेश हटवार, विनोद सपाटे, राजेश पडोळे, भाष्कर निर्वाण, उमाशंकर क्षिरसागर, मनोहर भाजीपाले, अजय सदनवार व २२ कर्मचारी सहभागी झाले होते. या कामबंद आंदोलनाला नगरपंचायत अध्यक्षा कल्पना भिवगडे व नगरसेवकांनी भेट देऊन पाठिंबा दिला. (तालुका प्रतिनिधी)
लाखांदूर, लाखनीत नगरपंचायत कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन
By admin | Published: January 05, 2017 12:34 AM