लाखांदूर : कोरोनाचे संक्रमण टाळण्यासाठी नागरिक, व्यापारी तथा सर्व आस्थापना चालकांद्वारा शासन नियम पाळण्याचे आवाहन करीत कोरोनाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या जागृतीसाठी लाखांदूर पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पथसंचलन केले. हे पथसंचलन १६ जून रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास स्थानिक लाखांदूर येथील पोलीस स्टेशनपासून शिवाजी टी पॉइंट चौकापर्यंत काढण्यात आले.
लाखांदूरचे ठाणेदार मनोहर कोरेट्टी, तहसीलदार अखिलभारत मेश्राम, नगर पंचायतीचे करनिर्धारण अधिकारी निखिल गाडगे आदी अधिकाऱ्यांच्या नेतृत्त्वात काढलेल्या पथसंचलनात कोरोना प्रतिबंधात्मक जागृतीविषयक घोषणा देत जागृती करण्यात आली. नागरिकांना मास्क व सॅनिटायझरचा वापर, सोशल डिस्टन्सिंगसह अन्य शासन निर्देशांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले. कोरोना संक्रमण टाळण्याच्या हेतूने शासनाने पहिल्या टप्प्यात ४५ वर्षे वयोगटावरील नागरिकांना आरोग्य विभागाअंतर्गत लसीकरण सुरू केले. दुसऱ्या टप्प्यात १८ ते ४४ वर्षे वयोगटातील नागरिकांसाठी लसीकरण सुरू करण्यात आले. शासनाद्वारे सुरू करण्यात आलेल्या या लसीकरण अभियानात नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता लसीकरणासाठी स्वत: पुढाकार घ्यावा, असे आवाहन स्थानिक पोलीस, तहसील तथा नगर पंचायत प्रशासनाद्वारे करण्यात आले.
या पथसंचलनात ठाणेदार मनोहर कोरेटी, तहसीलदार अखिलभारत मेश्राम, करनिर्धारण अधिकारी निखिल गाडगे आदी अधिकाऱ्यांच्या नेतृत्त्वात काढलेल्या पथसंचलनात सहाय्यक पोलीस निरीक्षक वीरसेन चहांदे, पुंडलिक मस्के, पोलीस उपनिरीक्षक संदीप ताराम, अमोल कोकाटे, पोलीस अंमलदार मनीष चव्हाण, प्रदीप राऊत, रंजनदास चुटे, नीलेश चव्हान, छत्रपती ठाकरे, राजेश शेंडे, ए. एस. आय. मडावीसह अन्य पोलीस अधिकारी, कर्मचारी, पोलीस व होमगार्ड उपस्थित होते.