लाखांदूर : महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियानांतर्गत बहुप्रतीक्षेत असलेल्या लाखांदूर नगरपंचायतीचा पाणीपुरवठा प्रकल्पाला नगरपरिषद प्रशासन संचालनालयामार्फत १६ कोटी ९१ लाख रुपये मंजुरी मिळाली आहे, तसेच प्रत्यक्षपणे कामाला सुरुवात होणार आहे. आमदार डॉ.परिणय फुके यांच्या प्रयत्नाने या योजनेला संजीवनी मिळाली आहे, तर दुसरीकडे भविष्यात लाखांदूरवासीयांना शुद्ध आणि मुबलक पाणी मिळणार आहे.
राज्यात अन्य नगरपंचायतप्रमाणे लाखांदूर नगरपंचायत हद्दीतील लोकसंख्या मोठ्या झपाट्याने वाढत आहे. लाखांदूरची सद्याची लोकसंख्या १० हजारांच्या घरात पोहोचली आहे. मात्र, आजवर लाखांदूर नगरवासीयांना शुद्ध आणि मुबलक पाणी मिळत नव्हते. कित्येकदा उन्हाळ्याच्या दिवसांत पाण्यासाठी पायपीट करावी लागत होती. पाणीटंचाईच्या अनेक तक्रारी निर्माण होत असल्याने, सजग आणि सूज्ञ नगरपंचायत सदस्यांनी नवीन पाणीपुरवठा प्रकल्प लाखांदूर नगरपंचायत हद्दीत निर्माण व्हावा, यासाठी ठराव घेतला. आमदार परिणय फुके यांच्याकडे लाखांदूर नगरात असलेली पिण्याच्या पाण्याची समस्या आणि वाढती लोकसंख्येचा विचार करून भविष्यासाठी लाखांदूर नगरात मोठा पाणीपुरवठा प्रकल्प तयार व्हावा, या मागणीचा आग्रह विद्यमान नगरपंचायत सदस्यांनी केला. आ.फुके यांनी लाखांदूर नगरपंचायत सदस्यांनी मागणी केलेल्या योजनेचा २०२० पासून शासन स्थरावर पाठपुरावा कायम ठेवून लाखांदूर नगरपंचायतला १६ कोटी ९१ लाखांची नवीन पाणीपुरवठा प्रकल्प मंजूर करून दिला. यापुढे भविष्यात लाखांदूरवासीयांना शुद्ध व मुबलक पाणी मिळणार आसल्याने आ.फुके यांचे आभार मानले जात आहेत.