चंदन मोटघरे लोकमत न्यूज नेटवर्क लाखनी : संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या जिल्ह्यातील भंडारा, पवनी, तुमसर, मोहाडी, लाखनी, साकोली, लाखांदूर या सातही पंचायत समित्यांच्या आरक्षण सोडतीत लाखनी पंचायत समिती सभापतीपद अनुसूचित जाती महिलेकरिता आरक्षित निघाले. यात सभापतीपद निश्चित झाले असून, उपसभापती पदासाठी रस्सीखेच राहणार आहे.
मे २०२२ मध्ये सभापती व उपसभापती पदाच्या पहिल्या अडीच वर्षाच्या कालावधीसाठी अत्यंत चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत काँगेसच्या प्रणाली सार्वे यांची सभापतीपदी, तर उपसभापतीपदी भाजपाच्या गिरीश बावनकुळे यांची वर्णी लागली होती.
२० जानेवारीला पार पडणाऱ्या सभापती व उपसभापती पदाच्या निवडणुकीत सभापतीपद निश्चित असले तरी उपसभापती पदासाठी भाजपा व काँग्रेसमध्ये रस्सीखेच आहे. अपक्ष उमेदवार दादू खोब्रागडेंची बाजू उपसभापती पदासाठी निर्णायक ठरेल.
हे सदस्य आले होते निवडून १२ सदस्यीय लाखनी पंचायत समितीची सार्वत्रिक निवडणूक सन २०२२मध्ये पार पडली. यात काँग्रेसचे सुनील बांते, विकास वसानिक, प्रणाली सार्वे, मनीषा हलमारे, अश्विनी कान्हेकर, योगिता झलके असे एकूण सहा, तर भाजपचे गिरीश बावनकुळे, सुरेश झंजाड, किशोर मडावी, शारदा मते, सविता राघोर्ते असे पाच व अपक्ष रवींद्र (दादू) खोब्रागडे असे १२ सदस्य निवडून आले होते.
सभापतीपद अनुसूचित जाती महिलेकरिता राखीव आरक्षणामध्ये लाखनी पंचायत समितीचे सभापतीपद अनुसूचित जाती महिलेकरिता राखीव आहे. निवडून आलेल्या १२ सदस्यांपैकी काँग्रेसच्या अश्विनी कान्हेकर या एकमेव सदस्य अनुसूचित जाती महिला प्रवर्गामधून निवडून आल्याने सभापतीपदी त्यांची वर्णी निश्चित मानली जात आहे