खासदार सुनील मेंढे यांनी बुधवारी सायंकाळी ग्रामीण रुग्णालयाला भेट दिली. त्यावेळी तेथे केवळ एक परिचारिका उपस्थित होती. एकही जबाबदार वैद्यकीय अधिकारी कर्तव्यावर नव्हते. विशेष म्हणजे एकही रुग्ण नव्हता. केवळ प्रसूतीसाठी आलेल्या दोन ते तीन महिलांचा अपवाद होता. जिल्ह्यात आजाराने थैमान घातले असताना, ग्रामीण रुग्णालय रिकामे असल्याचे खासदारांनी आश्चर्य व्यक्त केले. यावेळी बाह्यरुग्ण नोंदणी वहीची पाहणी खासदारांनी केली. विचारलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरे तेथील परिचारिका व नंतर आलेले वैद्यकीय अधिकारी देऊ शकले नाहीत. यावेळी त्यांनी लसीकरणाच्या आढावा घेतला. शासकीय आरोग्य व्यवस्थेवर लोकांचा विश्वास बसावा व त्यांनी या ठिकाणी येऊन उपचार घ्यावेत, यासाठी चांगली सेवा आणि सौजन्याची वागणूक देण्याच्या सूचना करण्यात आल्या. दरम्यान, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रियाज फारुकी यांच्याशी संपर्क साधून लाखनीत कोरोना सेंटर सुरू करण्याच्या सूचना केल्या.
यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष शिवराम गिरेपुंजे, माजी आमदार बाळाभाऊ काशिवार, ॲड. कोमल गभणे, अंगेश बेहलपाडे, शेषराव वंजारी, माजी नगराध्यक्ष ज्योतिताई निखाडे, देवरामजी चाचेरे, सत्यवान वंजारी, उमेश गायधनी, महेश आकरे, संदीप भांडारकर, पंकज चेटुले, विशाल जांगडे, शरद निर्वाण आदी उपस्थित होते.