चार प्राथमिक आरोग्य केंद्रे व ८९ गावांचा समावेश असलेल्या लाखांदूर तालुक्यातील रुग्ण सेवेसाठी स्थानिक लाखांदूर येथे काही वर्षांपूर्वी ग्रामीण रुग्णालयाची निर्मिती करण्यात आली. या रुग्णालयात जवळपास ३० रुग्ण खाटा असून, तीनच रुग्ण वाॅर्ड आहेत. या रुग्णालयात नेहमीच तालुक्यातील रुग्णांची वर्दळ दिसून येत असली, तरी आरोग्य कर्मचाऱ्यांची रिक्त पदे, क्ष-किरण सयंत्र, लघू रक्तपेढी, सोनोग्राफी यासह अन्य अत्याधुनिक सुविधांचा अभाव असल्याची ओरड आहे.
सामान्य वाॅर्डातच आकस्मिक रुग्णांवर उपचार केले जात असताना अपर्याप्त सुविधांअभावी अधिकतम रुग्ण इतरत्र हलविले जात आहेत. महिला रुग्णांसह बाल रुग्णांची देखील प्रचंड गैरसोय होत असल्याने गत अनेक वर्षांपूर्वीपासून या रुग्णालयात उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा देऊन अत्याधुनिक सोयी-सुविधा उपलब्ध करण्याची मागणी जनतेत केली जात आहे. मात्र, सदर मागणी शासन स्तरावर दुर्लक्षित असल्याने तालुक्यातील जनतेला आवश्यक अत्याधुनिक सोयी-सुविधांसाठी आंतरजिल्ह्यात महागडे खासगी उपचार करून घ्यावे लागत असल्याची चर्चा आहे. तालुक्यात भौतिक विकासाच्या सोयी-सुविधांचा विळखा निर्माण करताना जनतेच्या आरोग्यविषयक सुविधांकडे शासनाचे कायम दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला जात आहे.
दरम्यान, कोरोना संकटावर मात करण्यासाठी शासन स्तरावर नवनवीन उपाय योजना करण्यात आल्या. मात्र, उपलब्ध मूलभूत उपाय योजनांचा विकास केव्हा होणार? असा सवाल जनतेत केला जात आहे. राष्ट्रीय संपत्ती निर्मितीचे दिव्य स्वप्न तालुक्यात साकारले जाण्याचा आनंद जनतेत असला, तरी आरोग्याचा मूलभूत प्रश्न तालुक्यात केव्हा मार्गी लागणार? एकुणच तालुक्यात आरोग्य सोयी-सुविधांच्या अभावाने गोरगरीब जनतेची महागडे खासगी उपचार घेताना होणारी गळचेपी या भागातील प्रमुख लोकप्रतिनिधींना थांबविता येईल? आरोग्याच्या अत्याधुनिक सोयी-सुविधांचा अभाव असलेल्या येथील ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा देऊन आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करता येतील? अशा नानाविध समस्या तालुक्यात कायम दुर्लक्षित ठरल्याचा आरोप जनतेत केला जात आहे.