युवराज गोमासेलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : कोरोना महामारीमुळे दोन वर्षे वारकऱ्यांना पंढरीच्या विठ्ठलाचे दर्शन घेता आले नाही. संकटामुळे यात्राही थंडावली होती. आता लॉकडाउन संपुष्टात आल्याने आषाढी एकादशीची यात्रा यंदा भरणार आहे. जिल्ह्यातील वारकऱ्यांच्या दर्शनाची अभिलाषा पूर्ण व्हावी, सुरक्षित प्रवास करता यावा म्हणून एसटी महामंडळाने चार आगारांतून प्रत्येकी एका बसचे नियोजन केले आहे. यात्रेकरूंच्या सेवेसाठी लालपरी सज्ज झाली आहे. महाराष्ट्राचे दैवत विठुरायाच्या दर्शनासाठी वारकरी आतुरलेले असतात. दरवर्षी पंढरपुरात आषाढी एकादशीला चंद्रभागा नदीकाठी मोठी यात्रा भरते. आषाढी एकादशीला देवशयनी एकादशीसुद्धा म्हटले जाते. विठुमाउलीच्या भक्तांना फक्त तिच्या पायी माथा टेकता यावा, एवढीच आस असते. यासाठी ते पायी वारी करतात. मात्र, भंडारा जिल्ह्यापासून ७५० किलोमीटर अंतरावर पंढरपूर आहे. त्यामुळे येथून पायी वारी करता येत नाही. मात्र, तरीही जिल्ह्यात विठ्ठलाचे भक्त कमी नाहीत. कोरोना महामारीपूर्वी दरवर्षी विठ्ठलभक्त एसटीने पंढरपूर येथे जाऊन यात्रेत भाग घेतात. आराध्य विठुमाउलीच्या चरणी हजेरी लावीत माथा टेकतात. विठ्ठलभक्तीचा गजर करतात. जीवन सफल झाल्याचा आनंद उपभोगतात.मागील २ वर्षे कोरोना संक्रमणामुळे पंढरपूरची यात्रा रद्द करण्यात आली होती. परिणामी, वारींनाही जाता आले नाही व वारकऱ्यांच्या यात्रेत खंड पडला. मात्र, यंदा १० जुलै रोजी आषाढी एकादशी येत असल्याने, वारकरी नक्कीच ही संधी दवडणार नसून वारी करतीलच, अशी आशा राज्य परिवहन महामंडळाला आहे. यामुळेच जिल्ह्यातील भंडारा, साकोली, तुमसर व पवनी आगारांनी या यात्रेत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांसाठी प्रत्येकी एका बसचे नियोजन केले आहे. लालपरीलाही विठ्ठलभक्तांना घेऊन जाण्याची ओढ लागली आहे. एसटी सुरू झाल्यानंतर महामंडळाचे आर्थिक उत्पन्न वाढावे यासाठी विविध प्रयत्न केले जात आहेत. त्यातूनच वारकऱ्यांनाही सेवा उपलब्ध होऊ शकेल.
असे राहणार किमान तिकीट- भंडारा येथून पंढरपूरचे अंतर ७१४ किलोमीटर आहे. त्यासाठी ११९० रुपये भाडे, तर साकोली व पवनी येथून ७५४ किलोमीटरसाठी १२४० रुपये भाडे, तुमसरचे अंतर ७५० किलोमीटर असल्याने १२३० रुपये भाडे आकारले जाणार आहे.
जिल्ह्यातून यात्रेत सहभागी होण्यासाठी एका बससाठी किमान ३५-४० प्रवासी हवे आहेत. एवढी प्रवासी संख्या जमल्यास भंडारा, तुमसर, साकोली व पवनी आगारांतून एक लालपरी वारकऱ्यांना घेऊन जाईल. यापेक्षा जास्त प्रवासी असल्यास अगदी उत्तम नियोजन केले जाणार आहे. आणखी गाड्यांची सोय करता येणार आहे.-चंद्रकांत वडस्कर, विभागीय वाहतूक अधिकारी, रा. प., भंडारा