लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : चुलत भावाच्या मुलाच्या लग्नासाठी जाणे भंडारा येथील एका महिलेला चांगलेच महागात पडले. पंधरा तोळे सोन्याचे किंमत चार लाख ३५ हजार रुपयांचे दागिने बॅगमधून लंपास केले. लाखनी तालुक्यातील रेंगोळा येथे ही घटना घडली असून तीन दिवसांनंतर उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. शनिवारी एलसीबी पथकासह पालांदूरचे पोलीस चौकशीसाठी रेंगोळात दाखल झाले. भंडारालगतच्या गणेशपूर येथील आंबेडकर वॉर्डातील सरिता सूर्यभान राऊत (५५) असे दागिने चोरीस गेलेल्या महिलेचे नाव आहे. त्यांचा चुलत भाऊ राजकुमार फुलेकर यांच्या मुलाच्या लग्नासाठी ३ मे रोजी त्या रेंगोळा येथे गेल्या होत्या. लग्न आटोपून ४ मे रोजी भंडारा येथे आल्या. दरम्यान, शुक्रवारी आपल्या बॅगमधील दागिने चोरीस गेल्याचे लक्षात आले. तत्काळ त्यांनी भंडारा पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. चोरीची घटना पालांदूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असल्याने प्रकरण वळते करण्यात आले. सरिता राऊत यांच्या बॅगमधील साडेसात तोळ्यांच्या सोन्याच्या दोन बांगड्या, तीन तोळ्यांची सोन्याची चपलाकंठी, दोन तोळ्यांचा गोफ, दहा ग्रॅम वजनाच्या दोन अंगठ्या, चार ग्रॅम वजनाची नथ, नऊ ग्रॅम वजनाचे झुमके, तीन ग्रॅम वजनाच्या बिऱ्या, जुन्या वापरातील दागिने असे एकूण १५ तोळे सोन्याचे दागिने आणि ३५ हजार रुपये रोख लंपास केल्याची तक्रार देण्यात आली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
पोलीस अधिकारी रेंगोळात दाखल
- चोरीची मोठी घटना घडल्याने पोलीस अधिकारी शनिवारी थेट रेंगोळात पोहोचले. गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांसह पालांदूरचे ठाणेदार वीरसेन चहांदे, उपनिरीक्षक प्रकाश तलमले यांनी चौकशी सुरू केली. शनिवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत तपास सुरू होता. मात्र, चोरट्याचा सुगावा लागला नाही. या घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.