लाखनी : साकोली व लाखनी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या उद्धारासाठी स्थानिक सहकार नेते व सामाजिक कार्यकर्त्यांनी साकोली तालुका सहकारी शेतकी खरेदी विक्री समितीची स्थापना १९६० मध्ये केली होती. लाखनीची खरेदी विक्री समिती धान खरेदी करण्यात महाराष्ट्रात दुसऱ्या क्रमांकावर होती. पणन संघाने धान खरेदी केंद्राची पुनर्रचना केल्याने व नवीन धान खरेदी केंद्र लहान व नवीन सहकारी संस्थांना दिल्याने लाखनीच्या खरेदी विक्रीला शेवटची घरघर लागण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
नवीन व जुन्या १४९ धान खरेदी केंद्राची पुनर्रचना झाल्याने स्थानिक खरेदी-विक्री समितीचे चार धान खरेदी केंद्र बंद झाले आहेत. राजकीय हस्तक्षेपामुळे खरेदी-विक्रीची केंद्र बंद झाली आहेत. केंद्र बंद झाल्याने खरेदी-विक्रीच्या धान खरेदीत घट झाली आहे. त्यामुळे उत्पन्नावर परिणाम होणार आहे.
शेतकी खरेदी-विक्रीची लाखनी, एकोडी, सातलवाडा,परसोडी ही केंद्र बंद करण्यात आली आहेत. सध्या जेवनाळा व सालेभाटा ही दोन खरेदी केंद्र सुरू राहणार आहेत. त्यातील पालांदूर व मेंगापूर ही दोन खरेदी केंद्र सहकारी संस्थांना दिली आहेत. लाखनीचे कृषी उत्पन्न बाजार समितीला धान खरेदी केंद्र दिले आहे. लाखनीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीला २१ गावे जोडली आहेत. त्यापैकी अर्धी गावे शेतकी खरेदी विक्री समितीला द्यावी अशी मागणी जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांकडे केली होती. परंतु अद्यापही प्रतिसाद मिळाला नाही.
धान खरेदी केंद्र नवीन संस्थांना दिले जात आहे. त्यात राजकीय कार्यकर्ता असलेल्यांच्या संस्था जास्त आहेत. सदर संस्थांकडून धान खरेदी करताना मोठ्या प्रमाणात अवैध वसुली झाल्याची चर्चा आहे. धान शासकीय आधारभूत खरेदी केंद्रावर धान विकण्यासाठी शेतकऱ्याची वेगवेगळ्या मार्गाने लूट होते. नवीन सहकारी संस्था शेतकऱ्यांकडून इमारत निधी घेतात. सहकारी शेतकी खरेदी विक्री संस्थेने गेल्या ६० वर्षात शेतकऱ्यांचे हित साधले आहे. माफक दरात अन्नधान्य, खत पुरवठा करणे व लाखनी व साकोली तालुक्यात धान खरेदी केंद्राद्वारे शेतकऱ्यांचा धान खरेदी करण्याचे कार्य सुरू होते. नवीन धान खरेदी केंद्र नवीन संस्थांना दिल्याने खरेदी-विक्री संस्था डबघाईस येण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
संस्था कर्मचाऱ्यांचे वेतन करू शकणार नाही. मोजकेच एक दोन केंद्र असल्यामुळे उत्पन्नात घट होईल. खरेदी-विक्रीचा व्याप कमी झाल्याने सहकारी खरेदी विक्री संस्थेला टाळे लागण्याची शक्यता आहे.
बॉक्स
सहकारी संस्थांद्वारे खरिपात १ लाख क्विंटलची धान खरेदी
लाखनी केंद्राअंतर्गत लाखनी, गडेगाव, केसलवाडा (वाघ), चान्ना येथील गोदामात १२२८ शेतकऱ्यांचा ३२ हजार १४४ क्विंटल धान खरेदी करण्यात आला. सालेभाटा केंद्राअंतर्गत सालेभाटा, राजेगाव, गोंडसावरी, केसलवाडा (पवार), परसोडी, सिंदीपार, मुंडीपार, मोरगाव, खुर्शिपार येथील १२९१ शेतकऱ्यांचा ३२ हजार ८० क्विंटल धान खरेदी केला जातो. एकोडी खरेदी केंद्राअंतर्गत एकोडी, पिंडकेपार, चांदोरी, घानोड, बोरगाव येथील गोदामात ७५२ शेतकऱ्यांचा २१ हजार ९०१ क्विंटल धान खरेदी करण्यात आला. जेवनाळा खरेदी केंद्रावर गुरढा, कनेरी, गोंडेगाव, न्याहारवानी, किटाडी येथील गोदामांमध्ये ८२८ शेतकऱ्यांचा २२ हजार ७६९ क्विंटल धान खरेदी करण्यात आला आहे. परसोडी खरेदी केंद्रावर ५९५ शेतकऱ्यांचा १५ हजार ८७४ क्विंटल, सातलवाडा खरेदी केंद्रावर ९७४ शेतकऱ्यांचा २६ हजार ७५५ क्विंटल धान खरेदी झाली. लाखनी, एकोडी, सातलवाडा, परसोडी ही खरेदी केंद्रे जानेवारी २०२१ पासून नवीन सहकारी संस्थेकडे पणन अधिकाऱ्यांनी सोपविले आहेत. सहकारी संस्थांना मोडकळीत आणण्याचा प्रयत्न राजकीय नेत्यांच्या माध्यमातून सुरू आहे. शेतकऱ्यांना ओरबाडण्यासाठी राजकीय वरदहस्त असलेल्या संस्थांना खरेदी केंद्र दिले जात असल्याने सर्वसामान्य शेतकरी भरडला जात आहे.
कोट
नवीन खरेदी केंद्र दिल्याने खरेदी-विक्री संस्थेची धान खरेदी कमी झाली आहे. लाखनीचे खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी सुरू केलेली संस्था डबघाईस येण्याची शक्यता आहे.
घनश्याम पाटील खेडीकर,
सभापती,
सहकारी शेतकी खरेदी
विक्री संस्था, लाखनी