मडेघाट येथील घटना : मृत्यूचे कारण अस्पष्ट, आरोग्य प्रशासनाचा हलगर्जीपणा, लसीकरण भोवलेलाखांदूर : तीन महिन्यांपूर्वी प्रसूती होवून माहेरी आश्रयादाखल मातेने केवळ तीन महिन्याच्या तान्हुल्याला लसीकरणासाठी प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात दाखल केले. मात्र लसीकरण होवून अर्धा तास लोटत नाही तोच या तान्हुल्याचा जीव गेला. विक्की मंगेश कसार (३ महिने) असे मृतक तान्हुल्याचे नाव आहे. ही घटना लाखांदूर तालुक्यातील मडेघाट येथे ३ फेब्रुवारीला रोजी दुपारी ४ वाजता दरम्यान घडली. या प्रकरणी आरोग्य कर्मचाऱ्यांचा हलगर्जीपणा कारणीभूत ठरल्याचा आरोप पीडितांच्या कुटुंबियांसह गावकऱ्यांनी केला आहे. माहितीनुसार, मडेघाट येथील आरोग्य उपकेंद्रात त्रिगुणी लसीकरण कार्यक्रमांतर्गत दुसऱ्या टप्प्यातील लसीकरणासाठी ३ महिन्याच्या तान्हुल्याला घेवून कसारे नामक महिला गेली होती. या उपकेंद्रात जवळपास २४ बालकांना लसीकरण व पोलीओ डोज दिल्याची माहिती आहे. दुसऱ्या टप्प्यातील ६ बालकांना सदरचा उपचार करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. दरम्यान दुसऱ्या टप्प्यातील लसीकरण व पोलीओ डोज घेणारा हा तान्हुला घरी पोहचून अर्धा तास लोटत नाही तोच अस्वस्थ झाला. धास्तावलेल्या मातेने घरच्या मंडळीसह तात्काळ लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ हलविले. मात्र रुग्णालयात संबंधित तान्हुल्याला दाखल करताच येथील डॉक्टरांनी बाळाला मृत घोषित केले. येथील ग्रामीण रुग्णालयात बालरोग तज्ज्ञ नसल्याने या तान्हुल्याच्या शवविच्छेदनासाठी भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. भंडारा येथे देखील संबंधित तान्हुल्याचे शवविच्छेदन न करता तज्ज्ञांकडून या संपूर्ण प्रकरणाचा अहवाल तपासणीसाठी नागपूर वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आल्याची माहिती असून तब्बल एक दिवसानंतर शवविच्छेदन करण्यात आल्याचे सांगण्यात आले. के.डी. रासेकर नामक आरोग्य सेविकेने लसीकरण करताना तसेच पोलीओ डोज दिल्यानंतर केवळ अर्ध्या तासातच या तान्हुल्याचा जीव गेल्याने त्रिगुणी लसीकरण योजना वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. बाळ कोणत्याही आजाराने बाधीत नसताना दुसऱ्या टप्प्यातील लसीकरणानंतर या तान्हुल्याचा केवळ अर्ध्या तासातच जीव जाणे दु:खदायक ठरले आहे. डीपीटी, पोलीओ डोज, हिपॅटाईटीस बी व हब आदी पाच लसी अंतर्गत ‘पेंटाव्हायलंट’ नामक लस बालकाला देण्यात आल्याची माहिती आहे. बालक कुपोषित नसताना अथवा अन्य आजाराने बाधीत नसतानाही लसीकरणानंतर त्याचा जीव गेल्याने येथील आरोग्य सेविकेसह संबंध प्रशासनाचा हलगर्जीपणा असल्याचा आरोप केला जात आहे. मागील वर्षभरात लाखांदूर तालुक्यात २२ बालमृत्यू झाल्याची माहिती आहे. (तालुका प्रतिनिधी)
अर्ध्या तासात गेला तान्हुल्याचा जीव
By admin | Published: February 05, 2016 12:28 AM