पवनी (भंडारा) : जम्मू- काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यातील केरी सेक्टरमध्ये पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात पवनीचे सुपुत्र मेजर प्रफुल्ल अंबादास मोहरकर (३२) यांना वीरगती प्राप्त झाली. या वीरपुत्राला पवनी येथील वैजेश्वर मोक्षधाम येथे हजारोंच्या उपस्थितीत साश्रू नयनांनी अखेरचा निरोप देण्यात आला. त्यांच्यावर रविवारी मध्यरात्री १.४५ वाजता शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. लष्करी व पोलीस अधिकाºयांनी हवेत बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना दिली. प्रफुल्ल यांचे काका युवराज मोहरकर यांनी पार्थिवाला मुखाग्नी दिला. या वेळी प्रफुल्ल यांचे आई, वडील, पत्नी, नातेवाईक व पवनीवासीयांना अश्रू अनावर झाले होते.तत्पूर्वी हुतात्मा मोहरकर यांचे पार्थिव भारतीय वायुसेनेच्या विमानाने नागपूरच्या सोनेगाव विमानतळावर आणि नंतर पवनी येथे आणण्यात आले. अखेरचे दर्शन घेण्यासाठी हजारोच्या संख्येने पवनीवासीय वाट पाहात होते. वैजेश्वर मोक्षधाम येथे कर्नल सवित खन्ना, कर्नल शिवाजी, मेजर मनीष, कॅप्टन भारद्वाज यांनी लष्कराच्या वतीने मेजर प्रफुल्ल यांच्या पार्थिवाला पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना दिली.त्यानंतर, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, आमदार डॉ.परिणय फुके, आ.रामचंद्र अवसरे, आ.चरण वाघमारे, आ.बाळा काशिवार, नगराध्यक्षा पूनम काटेखाये, माजी खासदार नाना पटोले, जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता साहू, अप्पर जिल्हाधिकारी दिलीप तलमले, उपविभागीय अधिकारी बी.पी. पृथ्वीराज, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी नितीन पांडे, तहसीलदार गजानन कोकडे, मुख्याधिकारी माधुरी मडावी यांनी अंत्यदर्शन घेतले.
हुतात्मा प्रफुल्ल मोहरकर यांना अखेरचा निरोप, ‘अमर रहे’च्या घोषणांनी पवनीचा आसमंत दणाणला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 4:50 AM