तुमसर शहर जुने असून त्याची लोकसंख्या वाढली आहे. रस्ते जुनेच आहेत. मुख्य बाजार परिसरात अतिक्रमण वाढले आहे. त्यामुळे बाजारात दुचाकी घेऊन जाताना अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे पालिकेने अतिक्रमण काढायला सुरुवात केली आहे. गुरुवारी जुन्या किराणा चाळीतील अतिक्रमण काढण्यात आले. दुकानासमोरील उंबरे व पायऱ्या जेसीबीने तोडण्यात आल्या जुन्या किराणा चाळीत दुचाकी वाहने जात नाहीत. त्यामुळे ग्राहकांना कोणतीच अडचण नव्हती येथील किराणा चाळ मागील शंभर वर्षांपूर्वीची आहे, हे विशेष. चाळीमध्ये जेसीबीने अतिरिक्त अतिक्रमण काढले त्यामुळे दुकानदारांत नाराजी होती. गणपती मंदिराशेजारी अतिक्रमणेही काढण्यात आली. शहरात जिथे जिथे अतिक्रमण आहे, तेसुद्धा काढण्यात येणार असल्याची माहिती पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी दिली. मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण काढणार काय, असा प्रश्न चर्चेला आला आहे.
यापूर्वीही तुमसर शहरात अतिक्रमण काढण्यात आले होते; परंतु काही दिवसांनंतर परिस्थिती जैसे थेच निर्माण झाली. कायमस्वरूपी येथे अतिक्रमण होणारच नाही याची दक्षता पालिकेने घेण्याची गरज आहे. रस्ते जुने असून ते सुद्धा अरुंद आहेत. त्यामुळे शहराला बायपास रस्त्याची गरज आहे. तुमसर शहरात केवळ विनोबा भावे हा एकमेव बायपास रस्ता आहे. नवीन इमारती बांधकामांना परवानगी देतेवेळी त्यांनी अतिक्रमण करू नये व केल्यास त्याच वेळी दंडात्मक कारवाई करण्याची गरज आहे; परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात येते. अतिक्रमणाच्या आवाज उठविल्यानंतर कारवाई करण्यात येते. त्यामुळे इमारतधारकांचे मोठे नुकसान होते. हे होऊ नये याकरिता पालिकेने कायमस्वरूपी नियम तयार करून अतिक्रमण होऊच नये, याची दक्षता घेण्याची गरज आहे. अतिक्रमण काढताना पालिकेने भेदभाव करू नये, अशी प्रतिक्रिया सर्वसामान्य नागरिकांनी दिली. कुणावरही अन्याय होणार नाही याची दक्षता पालिकेने घेण्याची गरज आहे.