भंडारा : कोरोनाचे रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने सर्वांची चिंता वाढली आहे. कोरोना नियंत्रणाकरिता प्रत्येक नागरिकांनी लस टोचणे अत्यंत आवश्यक आहे. बीटीबी सब्जी मंडी येथे सुद्धा शेतकरी वर्गाला लसीकरण करीत पुढील पाच दिवस लसीकरण सुरू राहणार आहे. मंडीचे अध्यक्ष बंडू बारापात्रे यांनी स्वतः लस टोचत इतरांना प्रेरणा दिली.
लसीकरण शिवाय कोरोना नियंत्रण अशक्य आहे. त्यामुळे शासनाने पुरविलेल्या निर्देशानुसार पात्र लाभार्थ्यांनी लसीकरण करावे. असे शासन व प्रशासन स्तरावर वारंवार प्रबोधन करण्यात येत आहे. परंतु समाजात लसीकरणाच्या विरोधात चुकीच्या प्रचारामुळे लाभार्थी लसीकरण करिता पुढे येत नाही. ही समस्या ओळखत बीटीबीचे अध्यक्ष बंडू बारापात्रे यांनी स्वतःच्या मंडीतच शेतकरी वर्गाकरिता लसीकरण मोहीम सुरू केलेली आहे. याकरिता नगरपरिषदेचे मुख्याधिकारी व आरोग्य अधिकाऱ्याच्या टीमने सकारात्मक सहयोग केले. लसीकरण मोहीम पाच मे पर्यंत सुरू राहणार आहे. ४५ वर्षांच्या पुढील व्यक्तींना लसीकरणाची सोय आहे. कोरोना संकटात बंडू बारापात्रे यांनी केंद्र शासन व राज्य सरकार यांना आर्थिक सहकार्य केले आहे. गोरगरिबांना मोफत भाजीपाला सुद्धा वाटप केलेला आहे. रिकाम्या हातांना दररोज १०० महिला वर्गाला कामाला लावले आहे. वर्षभर कोरोनाचे नियंत्रण राखण्याकरिता पुढाकार सुद्धा घेतलेला आहे. आणखी एक पाऊल पुढे टाकले कोरोना नियंत्रणाकरिता लसीकरणाची मोहीम राबविण्यात आलेली आहे.
कोट बॉक्स
कोरोना संकटाला थांबविण्यासाठी लसीकरण हेच सुरक्षा कवच आहे. कोणत्याही खोट्या अथवा चुकीच्या विचाराला बळी न पडता लसीकरण शेतकरी, व्यापारी, हमाल यांनी करणे अत्यंत आवश्यक आहे. त्याची सुरुवात मी माझ्या स्वतः पासूनच केलेली आहे. पहिल्या दिवशीच ८० शेतकऱ्यांनी लसीकरणाचा फायदा घेतलेला आहे.
बंडू बारापात्रे, अध्यक्ष बीटीव्ही सब्जीमंडी भंडारा.