उल्लेखनीय म्हणजे १८ जानेवारीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यस्तरीय रस्ता सुरक्षा अभियानाचे उद्घाटन केले होते. या अभियानाच्या उद्घाटनाचे थेट प्रक्षेपण भंडारा येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात उपस्थित नागरिकांना दाखविण्यात आले. तसेच कार्यालयात विविध कामांसाठी येणाऱ्या वाहनधारकांना गुलाबपुष्प व रस्ता सुरक्षा माहिती पुस्तिका देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. १९ जानेवारी रोजी वाहनधारकांसाठी प्रबोधन कार्यक्रम घेण्यात आला. २० जानेवारीला हेल्मेटधारक चालकांची मोटारसायकल रॅली आयोजित करण्यात आली होती. तसेच कार्यक्रमादरम्यान कोविड १९ चा प्रसार होणार नाही, याबाबत विशेष दक्षता घेण्यात आली. कार्यालयात येणाऱ्या वाहनधारकांना रस्ता सुरक्षा माहितीपुस्तिका उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्रकुमार वर्मा यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. अभियान काळात विविध उपक्रमांचे व विशेष वाहन तपासणी मोहिमांचे आयोजन उपप्रादेशिक परिवहन कार्यालय आधारे करण्यात आले आहे. जिल्ह्यातील वाहनधारकांनी रस्ता सुरक्षा नियमांचे पालन करावे व सुरक्षितपणे वाहन चालवून अपघाताला आळा घालावा, असे आवाहनही रस्ता सुरक्षा समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी केले आहे, या प्रसंगी जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र वर्मा यांच्यासह प्रभारी सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी नितीन जठार, मोटारवाहन निरीक्षक वहीद चाऊस, सहायक मोटारवाहन निरीक्षक उत्तम पवार आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
जिल्ह्यात रस्ता सुरक्षा अभियानाला प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 4:32 AM