दिली जल शपथ : पंचायत समितीस्तरावर गटविकास अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शुभारंभ
भंडारा : जागतिक जल दिनानिमित्त जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष, जिल्हा परिषद, भंडारा यांच्यावतीने २२ मार्च रोजी जागतिक जल दिन आणि सप्ताह, तर पंचायत समितीस्तरावर गटविकास अधिकारी यांनी जागतिक जल दिनाचे आयोजन करून जलशपथ आणि जलजागृती सप्ताहाचा शुभारंभ केला.
जिल्हास्तरावर जिल्हा कक्षाच्या सभागृहात पार पडलेल्या कार्यक्रमाला उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) मनीषा कुरसंगे यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्हा कक्षाचे तज्ज्ञ अजय गजापुरे, अंकुश गभने, हेमंत भांडारकर, राजेश येरणे, बबन येरणे, गजाजन भेदे, प्रशांत फाये, आदित्य तायडे, निखील वंजारी आदींची उपस्थिती होती. उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) मनीषा कुरसंगे यांनी जल शपथ देऊन कार्यक्रमाचा शुभारंभ केला. पिण्याच्या पाण्याचे महत्व लक्षात घेऊन ते सर्वकाळ उपलब्धतेसाठी आणि शाश्वत वापरासाठी व्यापक प्रमाणावर जनजागृतीपर असे विविध उपक्रम ग्रामस्तरावर राबविण्याचे आवाहन केले.
भंडारा पंचायत समिती येथे गटविकास अधिकारी नूतन सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला. त्यांनी जल शपथ देऊन पिण्याच्या पाण्याची शुध्दता आणि स्रोतांची स्वच्छता ठेवण्याचे आवाहन केले. मोहाडी येथे गटविकास अधिकारी वंजारी यांच्या प्रमुख उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला. त्यांनी पंचायत समिती स्तरावर कार्यरत अधिकारी व कर्मचारी यांना जल शपथ दिली. तसेच तुमसर पंचायत समिती सभागृहात पार पडलेल्या जल शपथ आणि सप्ताह शुभारंभ कार्यक्रमात गटविकास अधिकारी धीरज पाटील यांनी अधिकारी व कर्मचारी यांना पाण्याबाबत शपथ दिली. ग्रामस्तरावर पिण्याच्या पाण्यासाठी प्रत्येकाने आपला सहभाग दर्शवावा, असे आवाहन केले.
लाखनी येथे गटविकास अधिकारी डॉ. जाधव, साकोली येथे गटविकास अधिकारी नीलेश वानखडे, तर लाखांदूर येथे गटविकास अधिकारी जी. पी. अगरते यांच्या प्रमुख उपस्थितीत सप्ताहाचा शुभारंभ करण्यात आला. कर्मचाऱ्यांना जलशपथ देऊन पिण्याच्या पाण्याचे महत्व सांगण्यात आले, तर पवनी येथे गटविकास अधिकारी वाळुंज यांनी कर्मचाऱ्यांना शपथ दिली.
२२ ते २७ मार्च या कालावधीमध्ये पाण्याचे महत्व, पाणी पुरवठ्यासाठी वापरात येणारे जलस्रोत यांचे संवर्धन, संरक्षण आणि जुन्या नादुरुस्त जलस्रोतांचे पुनरुज्जीवन, तसेच मोठ्या प्रमाणावर होणारी योजनांमधील पाणी गळती थांबविणे गरजेचे आहे. पाणी शुद्धता, पाणी वाचवा, पाणी सुरक्षितता आदींबाबत तालुक्यात गटविकास अधिकारी यांच्या मार्गदर्शनात ग्रामपंचायत स्तरावर सप्ताहभर विविध उपक्रम राबविणार आहेत.
बॉक्स
२४ मार्च रोजी पाणी जपून वापरण्याची आवश्यकता व पद्धती डिजीटल माध्यमांचा वापर करुन समजावून सांगणे, २५ मार्च रोजी पिण्याचे पाणी तपासणीमध्ये दूषित आलेल्या स्रोतांची उपाययोजना व दुरुस्तीबाबत माहिती देणे, २६ मार्च रोजी पाणी शुद्धीकरण कार्यपद्धती व टीसीएल वापर याबद्दल, २७ मार्च रोजी सार्वजनिक पिण्याच्या पाण्याचे स्रोत व साठवण टाकीची स्वच्छता करणे, शून्य गळती मोहीम, नादुरुस्त स्रोत दुरुस्त करणे आदी उपक्रम राबविले जातील. सदर उपक्रम राबविताना कोरोना प्रतिबंधक नियमावलीच्या उपाययोजनांबाबत केलेल्या प्रचलित नियमानुसार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.