स्थानिक पोलीस प्रशासनासह जिल्ह्याच्या ग्रामीण गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस अधिकाऱ्यांमार्फत गत काही महिन्यात तालुक्यातील विविध ठिकाणी अवैध दारु विक्रेत्यांसह दारू तस्करांविरोधात मोठ्या प्रमाणात पोलीस कारवाया करण्यात आल्या आहेत. लॉकडाऊन काळात सामाजिक शांतता व सुव्यवस्थेचा भंग होणार नाही, याची संपूर्ण काळजी घेत पोलीस प्रशासनांतर्गत अवैध दारू व्यावसायिका विरोधात केलेल्या कारवाया प्रशंसनीय ठरल्या आहेत; मात्र गत काही महिन्यांपासून तालुक्यातील आवळी टेंभरी विहिरगाव येथील वैनगंगा व चुलबंद नदीघाटातून अवैधपणे रेतीची तस्करी होत असल्याचे वृत्त नियमित प्रकाशित होत असताना पोलीस विभागाकडून संबंधित तस्करांविरोधात कोणतीच कारवाई केली जात नसल्याने जनतेत संशय व्यक्त केला जात आहे.
याप्रकरणी पोलीस प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने दखल घेऊन अवैध दारू विक्री व तस्करीवर आळा घालण्यासाठी केल्या जात असलेल्या फौजदारी कारवाई प्रमाणेच रेती तस्करांविरोधात देखील कारवाई करण्याची मागणी होत आहे.