तुलसीदास रावते लोकमत न्यूज नेटवर्कपवनारा : बावनथडी प्रकल्पाच्या मुख्य कालव्याच्या गेटमधून दाेन महिन्यांपासून पाण्याची गळती हाेत असून पाण्याचा माेठ्या प्रमाणात अपव्यय हाेत आहे. गळती झालेले पाणी कालव्यातून शेतकऱ्यांच्या शेतात शिरत असल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. एकीकडे शेतकरी रबी सिंचनासाठी पाण्यासाठी ओरड करीत असताना दुसरीकडे पाण्याचा अपव्यय हाेत आहे.महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशच्या सीमेवर बावनथडी प्रकल्प आहे. या प्रकल्पाचे पाणी कालव्याच्या माध्यमातून तुमसर आणि माेहाडी तालुक्याला मिळते. त्यासाठी कालव्याचे जाळे तयार करण्यात आले आहे. परंतु गत दाेन महिन्यांपासून या प्रकल्पाच्या कालव्याच्या मुख्य गेटला गळती लागली आहे. दरराेज हजाराे लीटर पाणी वाहून जात आहे. कालव्याच्या माध्यमातून पाणी शेतात पाेहाेचत आहे. सध्या शेतात मळणीचे काम सुरु असून धानाचा कळपा लावून ठेवल्या आहेत. शेतात पाणी शिरत असल्याने कळपा ओल्या हाेवून शेतकऱ्यांचे नुकसान हाेत आहे. तर दुसरीकडे अनेक शेतकरी सिंचनासाठी पाण्याची मागणी करीत आहे. कारली वितरिकेवरील गर्रा, आसलपाणी, कारली, जाेगेवाडा, चिचाेली, माेखेटाेला येथील शेतकऱ्यांनी उन्हाळी धानासाठी पाणी साेडण्याची मागणी केली हाेती. परंतु त्यांच्या मागण्याला वाटाण्याच्या अक्षदा लावण्यात आल्या. परिणामी १ नाेव्हेंबरला रस्ता राेकाे ही करण्यात आले. परंतु त्यानंतरही काेणत्याच उपाययाेजना करण्यात आल्या नाही. दुसरीकडे पाण्याचा माेठा अपव्यय हाेत आहे. या सर्व प्रकाराकडे प्रकल्प प्रशासनाचे दुर्लक्ष हाेत आहे.
आंदाेलनाचा इशारा बावनथडी प्रकल्पाच्या पाण्याचा अपव्यय थांबवून उन्हाळी धान पिकाला पाणी देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. उन्हाळी पिकासाठी पाणी मिळाले नाही तर आंदाेलन करण्याचा इशारा बघेडाच्या सरपंच प्रतीमा ठाकूर, सदन चाैधरी, कृष्णकुमार रहांगडाले, ईश्वर ठाकरे, रतनलाल पारधी, राजू पारधी यांनी दिला आहे.