अड्याळ : मॅजिक बस इंडिया फाऊंडेशन मागील ५ वर्षांपासून भंडारा जिल्ह्यात कार्यरत आहे. पवनी तालुक्यात मागील ६ महिन्यांपासून ६ वी ते ९ वीच्या मुलांसोबत काम करीत आहे. शाळाबाह्य मुलांचे प्रमाण कमी व्हावे तसेच मुलांमध्ये जीवन जगण्याचे कौशल्य विकसित व्हावे या उद्देशांना घेऊन संस्था शाळांसोबत काम करीत आहे. खेळाच्या माध्यमातून जीवन कौशल्य विकसित व्हावे यासाठी कोविडच्या सर्व नियमांचे पालन करून गावागावांत जाऊन संस्थेच्या शाळा साहायक अधिकारी यांनी सत्र राबवून कोविडविषयक जनजागृती केली.
५ ते ८ जानेवारीदरम्यान पवनी तालुक्यातील ६वी ते ९वीच्या वर्गातील प्रत्येक शाळेतून २ शिक्षक याप्रमाणे तालुक्यातील एकूण १३७ शिक्षकांचे प्रशिक्षण यशस्वीपणे पार पडले. यात पवनी तालुक्यातील एकूण ११ केंद्रांतील शिक्षक सहभागी होते. या चार दिवसीय प्रशिक्षणात ‘खेळातून शिक्षण - जीवन कौशल्य विकास’ याचे प्रशिक्षण तसेच प्रत्यक्ष प्रात्यक्षिकदेखील करण्यात आले. सदर प्रशिक्षण कोविड १९ चे पालन करूनच घेण्यात आले. सुरक्षित अंतर पाळले जावे यादृष्टीने एकूण चार केंद्रांवर प्रशिक्षण घेण्यात आले. तसेच चारही दिवस नियमित मॅजिक बस इंडिया फाऊंडेशनच्या टीमकडून थर्मामीटर व ऑक्सिमीटरने तपासणी करून तसेच हातांना सॅनिटायझर लावूनच प्रशिक्षण केंद्रात प्रवेश दिला जात होता.
खेळाच्या माध्यमातून मुलांचा शारीरिक व बौद्धिक विकास व्हावा यादृष्टीने जीवन कौशल्य विकास सत्र शाळेत राबविण्यासाठी चार दिवसांचे प्रशिक्षण घेण्यात आले. यात प्रत्येक मुलामुलीने आपले शिक्षण पूर्ण करावे, मुलांनी स्वत:च्या उपजीविकेचे साधन स्वतः निर्माण करणे. या उद्देशांवर स्केल प्रकल्प अंतर्गत शिक्षक प्रशिक्षण घेण्यात आले. यात विकास हायस्कूल पवनी येथे बेटाळा, सावरला, भूयार येथील शिक्षक प्रशिक्षणास हजर होते. सावित्रीबाई फुले कन्या विद्यालय पवनी येथे न. प. पवनी व पवनी केंद्राचे शिक्षक उपस्थित होते.
गांधी विद्यालय कोंढा येथे कोंढा, पिंपळगाव, आसगाव या केंद्रांचे शिक्षक तर प्रकाश विद्यालय अड्याळ येथे अड्याळ, चिचाळ, नेरला या केंद्रांतील शिक्षक उपस्थित होते. प्रशिक्षण समारोपासाठी गटविकास अधिकारी प्रमिला वाळुंज उपस्थित होत्या. यावेळी शिक्षकांकडून प्रत्यक्ष प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. प्रशिक्षणासाठी शिक्षण विभाग पंचायत समिती अंतर्गत चारही प्रशिक्षण केंद्रांवर संनियंत्रण अधिकारी यांची नेमणूक करण्यात आली होती. यासाठी गटशिक्षणाधिकारी नरेश टिचकुले, वरिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी विजय भुरे यांचे वेळोवेळी सहकार्य लाभले. या वेळी स्केल प्रकल्पाचे जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक निकी प्रेमानंद, प्रशिक्षक अर्जुन काटे, मंगेश कांबळे, स्वप्निल जाधव, संदीप राऊत, छाया गुरव, तालुका व्यवस्थापक नंदू जाधव, तसेच शाळा साहायक अधिकारी मोनाली धुर्वे, श्वेता येरमे, विलास मगरे, सूरज रापर्तीवार, रघुनाथ वानखडे, विशाल बोंबटकर तसेच समुदाय समन्वयक उपस्थित होते.