कामे ठप्प : प्रकरण मुख्य लेखापाल यांच्या निलंबनाचे लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : येथील उपवनसंरक्षक कार्यालयातील मुख्य लेखापाल यांना निलंबित केल्याच्या कारणावरुन कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी लेखणीबंद आंदोलन गुरुवारपासून सुरु केले आहे. सदर लेखापालांचे निलंबन रद्द करावे अशी कर्मचाऱ्यांची मुख्य मागणी असून या आशयाचे निवेदन मुख्य वनसंरक्षक (नागपूर) यांना पाठविण्यात आले आहे.निवेदनात नमूद केल्याप्रमाणे भंडारा वनविभागातील उपवनसरंक्षक कार्यालयात कार्यरत मुख्य लेखापाल एस. डब्ल्यू. बन्सोड यांच्यावर शासकीय रक्कमेचा अपहार केल्याचा ठपका ठेवून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.बन्सोड यांच्या खात्यामध्ये उपवनसंरक्षक भंडारा यांनी रक्कम संवितरण करण्याकरिता जमा केली होती. त्यांनी उपवनसंरक्षकांच्या आदेशाप्रमाणे संबंधित वनपरिक्षेत्राधिकारी यांच्या खात्यात रक्कम संवितरित केली आहे. परिणामी शासकीय कर्तव्य पार पाडतांना बन्सोड यांनी कुठल्याही प्रकारचा अपहार केला नाही. मात्र त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. ही कारवाई योग्य नसून त्यांचे निलंबन मागे घेण्यात यावे या मागणीला घेवून भंडारा विभागात कार्यरत सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी १ जूनपासून बेमुदत लेखणीबंद आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनात जवळपास ३२ अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश असून या आंदोलनाला अन्य वन कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी, कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ पुणे जिल्हा शाखा भंडारा व महाराष्ट्र राज्य वन व सामाजिक वनिकरण रोजंदारी मजुर कामगार संघटना यांनीही पाठींबा दिला आहे.
वनकर्मचाऱ्यांचे लेखणीबंद आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 03, 2017 12:16 AM