बालचंद संपत राऊत (४५), रा. फुटाळा, ता. मोहाडी असे जखमीचे नाव आहे. फुटाळा गावाचा परिसर घनदाट जंगलांनी व्यापलेला आहे. या गावात दुसरा रोजगार नसल्याने शेतीला पूरक व्यवसाय म्हणून जनावरे पालनपोषण करतात. नेहमीप्रमाणे गुराखी बालचंद राऊत यांनी आपली जनावरे शुक्रवारी जंगलात चारायला नेली होती. अचानक बिबट्याने एका गायीवर हल्ला चढिवला. बालचंदने आरडाओरडा केला असता त्याच्यावरच बिबट्याने हल्ला चढविला. त्याच वेळी एका म्हशीने बिबट्याला पळवून लावल्याने गुराख्याचे प्राण वाचले. काही जण हल्ला करणारा वाघ असल्याचे सांगतात. याबाबत वनविभागाशी संपर्क साधला असता बिबट असेल असा अंदाज व्यक्त केला. चौकशीअंती नेमका बिबट्या की वाघ हे कळेल, असेही सांगितले.
हा प्रकार माहीत होताच गावकऱ्यांनी लगेच त्याला रुग्णालयात दाखल केले. आमदार राजूभाऊ कारेमोरे, उपविभागीय अधिकारी नितीन सदगीर, वनपरिक्षेत्र अधिकारी केशव राठोड यांनी रुग्णालयात जाऊन जखमीची विचारपूस केली.