संजय साठवणेलाेकमत न्यूज नेटवर्कसाकोली : अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा बछडा मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील सानगडी ते नवेगावबांध रस्त्यावर शनिवारी सकाळी उघडकीस आली. मध्यरात्रीच्या सुमारास अपघातातबिबट्याचा बछडा ठार झाला असावा, असा संशय आहे. या अपघाताची माहिती होताच, वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.साकोली वनक्षेत्र कार्यालयांतर्गत येणाऱ्या सानगडी लगत नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाचे जंगल आहे. त्यामुळे या ठिकाणी वन्य प्राण्यांचा मोठ्या प्रमाणात संचार असतो. रात्री हे प्राणी शिकार आणि पाण्यासाठी रस्ता ओलांडतात. जंगलाच्या मधोमध हा रस्ता असून, त्यावरून सुसाट वाहने धावतात. त्यामुळे अपघाताच्या घटना घडतात.सानगडी - नवेगाव बांध रस्त्यावर अपघातात ठार झालेला बछडा हा पाच ते सहा महिने वयाचा असून, रस्ता ओलांडताना त्याला वाहनाने धडक दिली. या घटनेची माहिती मिळताच, सहायक वनसंरक्षक रोशन राठोड, वनपाल राजकुमार साखरे, साकोलीचे क्षेत्र सहायक सुनील खांडेकर, नीतेश कंगाली, संदीप भुसारी, वनसंरक्षक चंदू सार्वे घटनास्थळी पोहोचले. त्यांनी पंचनामा केला. त्यानंतर, विरसी येथील नर्सरीत शवविच्छेदन करून, तेथेच अग्निसंस्कार करण्यात आला.
वन्यजीव ठरत आहेत अपघाताचे बळी- साकोली तालुक्यात मोठ्या प्रमाणात जंगल असून, या जंगलातून जाणारे मार्ग वन्य प्राण्यांच्या जीवावर उठत आहेत. यापूर्वी अनेक अपघात होऊन वन्य प्राण्यांचा बळी गेला आहे. तालुक्यातून राष्ट्रीय महामार्ग आणि राज्य मार्ग गेले आहेत. जंगलामध्ये मानवी हस्तक्षेप वाढल्याने प्राणी इकडून तिकडे भ्रमंती करतात आणि अपघाताला बळी पडतात. यापूर्वी चारगाव फाटा येथे बिबट्याचा अपघाती मृत्यू झाला होता. मात्र, अद्यापपर्यंत एकाही वाहनाचा शोध लागला नाही. साकोली वनविभागांतर्गत येणाऱ्या जंगलामध्येही वन्यप्राण्यांच्या शिकारीच्या घटना घडल्या आहेत. तार-कुंपणात वीज प्रवाहित करुन वन्यजीवांचे बळी गेल्याच्या घटना घडल्या आहेत.