तुमसर : तुमसर वनपरिक्षेत्रांतर्गत खंदाड गावापासून केवळ १०० मीटर अंतरावर संरक्षित जंगलात एक बिबट १० दिवसापासून मृतावस्थेत पडून आहे. त्याचे संपूर्ण शरीर कुजलेल्या स्थितीत आहे. यासंदर्भात तुमसर वनविभाग मात्र अनभिज्ञ आहे. बिबट्याचा मृत्यू घातपाताने की नैसर्गीक हे अद्याप गुढ आहे.वाघ वाचवा अभियान संपूर्ण देशात गाजावाजा करून राबविने सुरू आहे. तुमसर वनपरिक्षेत्रातील बपेरा राऊंड अंतर्गत चिचोली-चांदपूर मार्गावर खंदाड गावापासून १०० मीटर अंतरावर संरक्षित जंगलात एक बिबट मृतावस्थेत सुमारे दहा दिवसापासून पडून आहे. याची माहिती संपूर्ण गावाला आहे. परंतु वनविभागाचा एकही कर्मचारी इकडे फिरकला नाही. या बिबट्याची शिकार करण्यात आली की, त्याचा मृत्यू नैसर्गीक झाला हे अद्याप गुढ आहे. संरक्षित व राखीव जंगलात कर्मचाऱ्यांचे दररोज गस्त असते हे विशेष. कर्तव्य न करणाऱ्या संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाईची येथे गरज आहे.चिखल्याचे उपसरपंच दिलीप सोनवाने, लालचंद भोरगडे, सुरेश तुरकर, नरेंद्र रिनके यांनी येथील जंगल वाऱ्यावर असून संबंधित जबाबदार अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी केली. (तालुका प्रतिनिधी)
संरक्षित जंगलात बिबट्याचा मृत्यू
By admin | Published: January 31, 2015 11:12 PM